Hot Posts

6/recent/ticker-posts

लंडनहून मुंबईत उतरताच संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात

 लंडनहून मुंबईत उतरताच संग्राम पाटील पोलिसांच्या ताब्यात

पहाटे दोन वाजल्यापासून चौकशी; असीम सरोदे यांचा अन्यायकारक कारवाईचा आरोप
मुंबई / सोलापूर (कटूसत्य वृत्त) :– लंडनहून मुंबईत आगमन करताच संग्राम पाटील यांना पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतल्याची घटना घडली असून, या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाटील व त्यांच्या पत्नीला पहाटे दोन वाजल्यापासून चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे.
ॲड. असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम पाटील यांच्याशी त्यांचा थेट संपर्क झाला असून, सध्या पोलिसांकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. “ही कारवाई अन्यायकारक असून छळवादाच्या स्वरूपाची आहे,” असा आरोप सरोदे यांनी केला आहे.
निर्भीड भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व
संग्राम पाटील हे मूळचे भारतीय नागरिक असून सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडणारे विचारवंत म्हणून ते ओळखले जातात. लंडनमधील भारतीय समुदायामध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर असल्याचे सरोदे यांनी नमूद केले. “लंडनमध्ये माझे भाषण आयोजित करणाऱ्यांमध्ये संग्राम पाटील अग्रणी होते,” असेही त्यांनी सांगितले.
बॉण्डवर सुटका होण्याची शक्यता
पोलिसांकडून संग्राम पाटील यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन काही अटी व शर्ती घालून त्यांची सुटका केली जाईल, असे सध्या दिसत असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रक्रियेत कोणतीही बेकायदेशीर अथवा दबावाची कारवाई होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कायदेशीर मदतीचे आश्वासन
“संग्राम पाटील यांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत लागल्यास ती उपलब्ध करून देण्यात येईल,” असे सांगत सरोदे यांनी पोलिसांना इशारा दिला की, “कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू नये.”
पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे अधिकार आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाकडे सामाजिक व राजकीय स्तरावर लक्ष वेधले जात आहे. दरम्यान, या कारवाईबाबत पोलिस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments