ना. जयकुमार गोरे यांची धर्मराज काडादी यांच्याशी भेट
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला राजकीय महत्त्व
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मनपा निवडणूक रंगात आलेली असताना झालेल्या या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी काडादी यांची भेट घेण्यासाठी गंगा निवास येथे भेट दिली. यावेळी धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नियोजनाबाबत, तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
लिंगायत समाजावर प्रभाव असलेल्या नेत्याशी संवाद
लिंगायत समाजात मोठे प्रस्थ असलेले धर्मराज काडादी यांची पालकमंत्री गोरे यांनी घेतलेली भेट ही केवळ सौजन्यभेट नसून, समाजघटकांमध्ये समन्वय साधत बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या भेटीकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, तसेच शरणराज काडादी, पुष्पराज काडादी, अक्षय अंजीखाणे उपस्थित होते.
या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments