बंदपट्टे यांच्या संपर्क कार्यालयाचे भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)च्या प्रचाराला बळ; चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनसोलापूर (कटूसत्य वृत्त) – सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या प्रचाराला वेग आला असून, प्रभाग क्रमांक ४ मधील उमेदवार सी. ए. सुशील बंदपट्टे यांच्या बाळीवेस येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री व सोलापूरचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी उत्साहात पार पडले. फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनानंतर भरणे यांनी सुशील बंदपट्टे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्याची माहिती घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या प्रभागातील चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना केले.
यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीला सोलापूरची जनता निश्चितच स्वीकारत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” सत्तेत असलेल्या नेतृत्वामुळे शहरासाठी अधिक निधी व विकासकामे मंजूर करून घेण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांच्या समस्यांचा थेट आढावा
उद्घाटनानंतर भरणे यांनी प्रभागात पायी फिरून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज आदी स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी मते मांडली. या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, युवती अध्यक्षा संध्या सोनवणे, उमेदवार सी.ए. सुशील बंदपट्टे, कविता चंदनशिवे, सारिका फुटाणे, विश्वनाथ बिडवे, सुहास कदम, बसवराज कोळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments