४६ गुन्ह्यांतील ७४ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत
महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे निमित्त सोलापूर पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने एक दिलासादायक व विश्वासार्ह उपक्रम राबविण्यात आला. शहरातील सात पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या ४६ विविध गुन्ह्यांतील एकूण ७४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित फिर्यादी व तक्रारदारांना परत करण्यात आला.
सोलापूर शहर हद्दीतील घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी तसेच इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने व इतर मौल्यवान वस्तू या कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
या मुद्देमाल वितरण कार्यक्रमाला पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय), पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने, प्रताप पोमण, दिलीप पवार यांच्यासह विविध शाखांचे व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच संबंधित पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक अरविंद माने, महादेव राऊत, शिवाजी राऊत, सुरज मुलाणी, प्रमोद वाघमारे, नामदेव बंडगर, दादा गायकवाड, उमाकांत शिंदे, श्रीशैल गजा, नागनाथ सुधर्म कानडे तसेच मुद्देमाल विभागाचे काम पाहणारे पोलीस अंमलदार लक्ष्मी सुरवसे, सूर्यकांत माळी, वैशाली वाघमारे, कुंडलिक म्हेत्रे, मालनबी बिराजदार, आंबोजी कोळी, मोईन मुजावर, मधुसूदन बेलछेत्रे, अश्विनी लोणी, सुनील लाटे यांचीही उपस्थिती होती.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास
या उपक्रमामुळे चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांतील पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिस प्रशासनाबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल शोधून काढणे आणि तो कायदेशीर प्रक्रियेनंतर मूळ मालकांना परत देणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे व तत्परतेचे प्रतीक असल्याचे यावेळी बोलून दाखवण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी फिर्यादी नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
0 Comments