Hot Posts

6/recent/ticker-posts

बदलापूर प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याचा विरोधकांचा आरोप; नैतिकतेवर प्रश्नचिन्ह

 बदलापूर प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याचा विरोधकांचा आरोप; नैतिकतेवर प्रश्नचिन्ह



मुंबई सोलापूर (कटूसत्य वृत्त):– बदलापूर येथील लैंगिक शोषण प्रकरणातील सहआरोपी असलेल्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र भाजपवर तीव्र टीकेची झोड उठली आहे. या निर्णयामुळे भाजपची नैतिक भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, सामाजिक कार्यकर्ते व विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
या संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, “नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून अशा वादग्रस्त पार्श्वभूमीच्या व्यक्तीस स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले. भाजपला जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज वाटायला हवी. सत्ता आणि राजकीय फायद्यासाठी पक्ष अजून किती खालची पातळी गाठणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाजप कोणता संदेश देऊ पाहते?
विरोधकांनी असा आरोप केला आहे की, या निर्णयातून भाजप समाजाला चुकीचा संदेश देत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबतची भूमिका केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट होत आहे. “अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध व्हायला हवा,” अशी मागणीही करण्यात येत आहे.
एन्काउंटरवरही प्रश्न
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणखी गंभीर आरोप उपस्थित करण्यात आले असून, “बलात्कारी नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला, तो एन्काउंटर नसून थेट खून होता का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विधानांमुळे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर आणि तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जनतेच्या विस्मरणावर खंत
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना टीकाकारांनी जनतेच्या स्मृतीवरही बोट ठेवले आहे. “जनता हे सर्व विसरते, हेच या व्यवस्थेचे मोठे दुर्दैव आहे,” अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांवर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, येत्या काळात याचे पडसाद राजकीय पातळीवर उमटण्याची शक्यता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments