Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरेल – पालकमंत्री जयकुमार गोरे

 मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरेल – पालकमंत्री जयकुमार गोरे


मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी ; ५० फुटांचा भव्य स्टेज, भगवा पडदा आणि हजारो नागरिकांसाठी आसन व्यवस्था
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज शनिवार (दि. १०) रोजी होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा ही महापालिका निवडणुकीतील निर्णायक टप्पा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सभेच्या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी तयारीचा आढावा घेतला.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा देत सर्व २६ प्रभागांमधून १०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेच्या तयारीवर पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असून शुक्रवारी दुपारी त्यांनी सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, बिज्जू प्रधाने, विजय कुलथे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,
“सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरसाठी पाणीपुरवठा पाइपलाईन योजना, विमानसेवा, आयटी पार्कसारख्या महत्त्वाकांक्षी योजना दिल्या असून अनेक विकासकामे प्रत्यक्षात सुरू आहेत. आगामी काळातही देवभाऊ सोलापूरसाठी मोठ्या विकास योजना जाहीर करणार आहेत. त्यामुळे ही सभा निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरेल.”
मुख्यमंत्री फडणवीस या सभेत कोणते मुद्दे मांडणार, कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने कार्यकर्ते आणि नागरिकांना करण्यात आले आहे.
चौकट
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेसाठी भव्य तयारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा होत असल्याने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
सभास्थळी भव्य मंडप उभारण्यात आला असून ५० फुटांचा मोठा स्टेज तयार करण्यात आला आहे. स्टेजच्या पाठीमागे भगव्या रंगाचा आकर्षक पडदा लावण्यात आला आहे. उपस्थितांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी मंडपावर छताची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
हजारो नागरिक या सभेस उपस्थित राहणार असल्याने गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments