सी. ए. सुशील बंदपट्टे यांचा मतदारांशी संवाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याचा आढावा घेत मतदारांचा विश्वास आणि आशीर्वाद मागितला.
सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी देशातील अत्यंत कठीण मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या कर्तृत्वाची सुरुवात केली. मेहनत, प्रामाणिकपणा आणि निष्ठेच्या जोरावर गेल्या वीस वर्षांत त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्याचबरोबर सामाजिक कार्यालाही त्यांनी कायम प्राधान्य दिले आहे.
सोलापूरमधील बाळीवेस, यल्लेश्वरवाडी येथे वडार समाजाच्या श्री अय्या गणपतीच्या २१ फूट उंच मूर्तीचे व भव्य मंदिर उभारणीचे कार्य बंदपट्टे कुटुंबाने मनापासून केले असून, त्यातून सामाजिक एकोपा व धार्मिक भावनेचे दर्शन घडते. कोरोना महामारीच्या काळात समाज अडचणीत असताना चंद्रनील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हजारो गरजू नागरिकांना मोफत धान्य, जीवनावश्यक साहित्य व जनता भोजनाचे डबे वितरित करण्यात आले. त्या कठीण काळात बंदपट्टे कुटुंब अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरले.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याच्या विश्वासातून दरवर्षी प्रभागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्याचा उपक्रमही ते सातत्याने राबवत आहेत. याशिवाय निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत करून अनेक कुटुंबांना त्यांनी आधार दिला आहे. कोणताही गाजावाजा न करता, निस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करणे हीच बंदपट्टे कुटुंबाची ओळख असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ४ मधून OBC प्रवर्गातून निवडणूक लढवणारे सी. ए. सुशील बंदपट्टे यांनी, समाजासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक मोठ्या जबाबदारीने काम करण्याची तयारी दर्शविली. “आपले एक मत अनेक कुटुंबांची आशा आणि आधार ठरू शकते. चांगल्या माणसांना संधी दिली, तर चांगले काम निश्चित घडते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक ४ मधील शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार
अ. कविता चंदनशिवे, ब. सी. ए. सुशील बंदपट्टे, क. सारिकाताई फुटाणे व ड. विश्वनाथ बिडवे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
.jpg)

0 Comments