Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्तांचा कडक इशारा

 मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्तांचा कडक इशारा


मतमोजणीपर्यंत ५३ जण तडीपार; आणखी ६७ जणांची यादी तयार
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आता सर्वांचे लक्ष मतदान व मतमोजणीकडे लागले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अनुचित प्रकाराविना शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी कठोर पावले उचलली आहेत. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या समाजकंटकांविरोधात थेट कारवाई करत, तब्बल ५३ जणांना ८ जानेवारी ते १६ जानेवारीपर्यंत म्हणजेच मतमोजणी होईपर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे.
याबाबतचे अधिकृत आदेश पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी गुरुवारी काढले असून, संबंधित पोलिस ठाण्यांना ते तात्काळ बजावण्यात आले आहेत.
ज्यांच्यावर दोन किंवा त्याहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपींची पोलिस ठाणेनिहाय यादी तयार करण्यात आली होती. या यादीत शहरातील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५३ जणांचा समावेश आहे. निवडणूक काळात दहशत, दबाव किंवा हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीतील सर्वाधिक १५ जणांचा समावेश आहे. त्याखालोखाल जेलरोड (६), एमआयडीसी (१०), जोडभावी (३), सदर बाजार (११) आणि सलगरवस्ती (८) येथील इसमांवर ही कारवाई झाली आहे.
तडीपार केलेल्या व्यक्तींना मतदानाच्या दिवशी फक्त दोन तासांचा ठरावीक कालावधी देण्यात आला आहे. त्या वेळेतच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावायचा असून, त्यानंतर ते निवडणूक कार्यक्षेत्रात आढळल्यास त्यांच्यावर पुन्हा कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
“मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी उपद्रव माजवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झालेल्या आणखी ६७ उपद्रवी इसमांची दुसरी यादी तयार असून, गरज पडल्यास त्यांच्यावरही तात्काळ तडीपारीची कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.
“कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावणाऱ्यांना कोणतीही तडजोड केली जाणार नाही. निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे हेच आमचे प्राधान्य आहे,” असा स्पष्ट संदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी या कारवाईतून दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments