Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्तेसाठी भाजपचे दबावतंत्र – प्रणिती शिंदे

 सत्तेसाठी भाजपचे दबावतंत्र – प्रणिती शिंदे


मनपा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार जोरात; भाजपवर गंभीर आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):– सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला असून खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका, पदयात्रा आणि मतदारांच्या थेट गाठीभेटी घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत, “सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असून प्रशासनावर दबाव टाकून आणि पैशाच्या जोरावर मनपाची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप केला.
प्रणिती शिंदे यांनी कॉर्नर बैठकीत मतदारांना संबोधित करताना सांगितले की, “काँग्रेसने आजपर्यंत सोलापूर शहराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. मात्र भाजपच्या सत्ताकाळात शहरात विकासाऐवजी भ्रष्टाचारच वाढला. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न जसेच्या तसे राहिले आहेत.”
भाजपकडून लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या, “काँग्रेसचा उमेदवार नको म्हणून भाजप मतदारांवर जबरदस्तीने दुसरा उमेदवार लादण्याचा प्रयत्न करत आहे. मतदारांना घाबरवून, प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवणे हा लोकशाहीचा सरळसरळ अपमान आहे.”
काँग्रेसच्या बाजूने वातावरण
प्रभाग १५ सह शहरातील अनेक भागांत काँग्रेसचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचा दावा करत, थेट जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांवर आधारित मुद्दे आणि संघटनात्मक ताकद यामुळे वातावरण काँग्रेसच्या बाजूने झुकत असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले. नागरिकांशी संवाद साधताना पाणीटंचाई, खराब रस्ते, वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या प्रश्नांना काँग्रेस प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
१६ जानेवारीचा निकाल जनतेचा कौल
“१६ जानेवारीचा निकाल केवळ महानगरपालिकेचा निकाल नसेल, तर भाजपच्या फसव्या आणि दडपशाहीच्या राजकारणावर जनतेचा कौल असेल. सोलापूरची जागरूक जनता काँग्रेसलाच संधी देईल,” असा विश्वास व्यक्त करत प्रणिती शिंदे यांनी मतदारांना काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments