महायुती सरकारकडून शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक” – आ. रोहित पवार यांचा आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – राज्यभरात झालेल्या पिकांच्या नुकसानीनंतर महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली केवळ आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात तुटपुंजी मदतच आली आहे, अशी तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
राज्यातील ७० लाख हेक्टर पिकांचे नुकसान, हजारो जनावरांचा मृत्यू, आणि कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असतानाही सरकारने हेक्टरी ₹५० हजार मदतीची घोषणा करूनही ती अंमलात आणली नाही, असा आरोप पवार यांनी केला. “बळीराजा अक्षरशः कोलमडून पडला आहे, पण सरकारच्या काळजाला पाझर फुटत नाही. ही मदत केवळ कागदावरच आहे,” अशी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्यांना बागायती अनुदान मिळायला हवे होते त्यांना कोरडवाहू शेतकऱ्यांप्रमाणे वागणूक देण्यात आली. तर कोरडवाहू शेतकऱ्यांना कुणाला ₹३ हजार, कुणाला ₹४ हजार इतकी तुटपुंजी मदत देऊन सरकारने तोंडाला पानं पुसली आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे ठरले आहे.”
तसेच अजूनही अनेक शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचे नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत, दगावलेल्या जनावरांच्या भरपाईचेही पैसे न मिळाल्याने ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे.
“सरकारने आता तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं थांबवावं आणि त्यांना न्याय्य मदत देण्याची तात्काळ कार्यवाही करावी,” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि सरकारकडून होणारी ढिसाळ कारवाई पाहता आगामी काळात या विषयावर महायुती सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
.png)
0 Comments