महात्मा फुले स्मारकाच्या दुरवस्थेविरोधात निषेध मोर्चा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाची सुरू असलेली दुरवस्था आणि महापालिकेकडून चालू असलेले दुर्लक्ष याविरोधात OBC समाजात तीव्र नाराजी उसळली आहे. या निषेधाला स्वरूप देण्यासाठी OBC समाजाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी आणि पुरोगामी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना शुक्रवार, सकाळी 8.30 वाजता सुपर मार्केट, सोलापूर येथे मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन ॲड. राजन दिक्षित यांनी केले आहे.
मोर्चाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण काढली जाईल. त्यानंतर स्मारकाचे सुशोभीकरण न केल्याबद्दल सोलापूर महापालिकेविरोधात तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे.
महात्मा फुले हे समाजपरिवर्तनाचे अग्रदूत असून, त्यांच्या स्मारकाची होत असलेली अधोगती ही शहराच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी बाब असल्याचे OBC समाजातील नेत्यांचे मत आहे.
गत काही दिवसांपासून सोलापूर शहरातील OBC समाजात प्रशासनावरील अविश्वास, स्मारकांच्या स्थितीविषयी नाराजी आणि राजकीय उपेक्षेविरोधात असंतोष यामुळे नवीन राजकीय हालचाली दिसू लागल्या आहेत. या निषेध मोर्चामुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. कार्यकर्त्यांची उपस्थिती किती मोठ्या प्रमाणात राहते आणि महापालिका पुढे कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments