पुरामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर'
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी युवा महोत्सवामुळे आणि आता पूरस्थितीमुळे परीक्षा लांबली आहे. १४ ऑक्टोबरपासून सुरू होणारी परीक्षा आता २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी काढलेल्या आदेशानुसार, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याशिवाय परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारे पेपर परीक्षेच्या शेवटी घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ८८ नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश विद्यापीठातील संकुलांसह सर्व संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलावी आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी करावी, अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी कुलगुरूंकडे केली होती.
'या' विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क माफी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क स्विकारताना ज्या विद्यार्थ्यांची ५० टक्के किंवा त्याहून कमी विषय राहिले आहेत, त्यांना या परीक्षेच्या एकूण शुल्कात ५० टक्के माफी असणार आहे. ५० टक्क्यापेक्षा जास्त विषयांसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. पण, एखाद्याचे सात विषय असतील तर त्यापैकी चार विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास ५० टक्के शुल्क माफी मिळेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
.png)
0 Comments