पटणेंच्या जाण्यांने ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व हरपले
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, तसेच सध्या नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष असलेले माजी आमदार गंगाधरजी पटणे यांच्या निधनाने ग्रंथालय चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोलापूर येथील साहित्य निकेतन ग्रंथालयात सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व हुतात्मा वाचनालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गंगाधरजी पटणे यांच्या निधनाची दुःखद वार्ता समजताच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या आजन्म योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला. ग्रंथालय चळवळीशी ते इतके एकरूप झाले होते की मंत्रालयात गेले असता इतर आमदार, मंत्री व अधिकारी त्यांचा उल्लेख आवर्जून “आले ग्रंथालयाचे आमदार” असा करत असत, अशी आठवण ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ नेते कुंडलिक मोरे यांनी आपल्या मनोगतातून करून दिली.
मोरे पुढे म्हणाले की, “गंगाधरजी पटणे यांचे जाणे ही केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण ग्रंथालय चळवळीची मोठी हानी आहे. त्यांनी दिलेले नेतृत्व, मार्गदर्शन आणि त्याग कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणादायी ठरेल. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते त्यांचे योगदान कधीही विसरणार नाहीत.”
त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाची निवड अनेकदा बिनविरोध होत गेली. सर्वांना सोबत घेऊन, अचूक मार्गदर्शन करत त्यांनी ग्रंथालय चळवळीची वाटचाल पुढे नेली, असे वक्त्यांनी सांगितले.
या श्रद्धांजली सभेला जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, वृषाली हजारे, कोषाध्यक्ष सारीक माढेकर व गितांजली गंभीर आदींसह वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

0 Comments