मराठा, धनगर, लिंगायतसह बहुजन समाजातील नेत्यांना यंत्रणेच्या माध्यमातून भाजप अटकेची भीती घालते-अमोल शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असताना पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत थेट हस्तक्षेप करत आमदार देवेंद्र कोठे यांना हाताशी धरून मराठा, धनगर, लिंगायतसह बहुजन समाजातील नेत्यांना यंत्रणेकडून भाजपकडून अटकेची भीती घालून समाजाच्या नेतृत्वाला संपविण्याचे षडयंत्र रचत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व पॅनल प्रमुख अमोल शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
पालकमंत्री गोरे हे रात्रीबेरात्री सोलापुरात फिरून प्रभाग क्रमांक ७ मधील मराठा समाजाचे नेतृत्व व उमेदवार अमोल शिंदे, प्रभाग क्रमांक ५ मधील दलित चळवळीचे नेते आनंद चंदनशिवे तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे यांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव आखत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार देवेंद्र कोठे यांनी यापूर्वी राजाभाऊ खराडे, त्यानंतर अमोल शिंदे आणि आता पद्माकर काळे यांचा वापर करून मराठा समाजाचे नेतृत्व संपविण्याचा विडा उचलला असल्याचेही शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. महापालिकेत पालकमंत्री व आमदार कोठे यांना केवळ ‘जी हुजूर’ करणारी माणसेच हवी असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत दडपशाहीच्या राजकारणामुळे भाजप अडचणीत आला होता. आता महानगरपालिकेतही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हा परिषदेतसुद्धा भाजपकडून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला. “हा लोकशाहीविरोधी डाव सोलापूरकरांनी वेळीच हाणून पाडला पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.
जाणीवपूर्वक आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असून यंत्रणेकडून अटकेची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभीर भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र अशा कोणत्याही दबावाला न घाबरता आपण लोकांच्या प्रश्नांसाठी आणि समाजाच्या नेतृत्वासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे अमोल शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
या पत्रकार परिषदेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकट
आ. देवेंद्र कोठे या निवडणुकीत मुख्य चेहरा...! एक व्यक्ती म्हणजे समाज नाही..! निवडणूक हातातून गेल्याने हा केविलवाणा प्रयत्न...! - भाजपा नेते आमदार सचिन कल्याणशेट्टी
0 Comments