Hot Posts

6/recent/ticker-posts

३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा

 ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा




क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापूर शहरातील एक हजार ९१ बूथवर मतदान पेट्या वितरित करण्यात आल्या आहेत.

त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्तही प्रत्येक बूथवर दाखल झाला. निवडणुकीसाठी सोलापूर शहर व बाहेरील अधिकारी, अंमलदार असा एकूण साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. ४८ तासांचा हा बंदोबस्त मतदान पेट्या गोदामात जमा झाल्यावर संपणार आहे.

सोलापूर महापालिकेसाठी बाहेरील जिल्ह्यातून एक पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक, ६० सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ४७५ अंमलदार आले आहेत. हा बंदोबस्त सोलापूर शहरातील १८०० अंमलदारांसमवेत असणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी शिघ्र प्रतिसाद दलाच्या पाच तुकड्या, दंगा नियंत्रण सहा पथके, राज्य राखीव पोलिस बलाच्या दोन तुकड्या देखील बंदोबस्तात असतील.

प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत दोन बीट मार्शल, सेक्टर पेट्रोलिंगच्या ३५ गाड्या शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक बूथ आणि तेथील १०० मीटर परिसरात देखील पोलिस असणार आहेत. शहरातील संपूर्ण बंदोबस्तावर पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन यांचे विशेष लक्ष असणार आहे. वरिष्ठ अधिकारी देखील शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत.

मतदान पेट्या जमा केल्यावर संपेल बंदोबस्त

महापालिकेसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान पार पडल्यावर प्रत्येक मतदान केंद्रावरील पेट्या रामवाडी गोदामात जमा केल्या जातील. त्यानंतर बुधवारी (ता. १४) नेमलेला बंदोबस्त संपणार आहे. गुन्हे शाखा, विशेष शाखा, राज्य गुप्तावार्ता व स्थानिक पोलिसांची पथकांसह साध्या वेशातील पोलिस देखील शहरात फिरणार आहेत. निकालाच्या दिवशी शुक्रवारी (ता. १६) देखील शहरात असाच तगडा बंदोबस्त असणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments