Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूर जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळांमध्ये शरले पाणी'

 साेलापूर जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळांमध्ये शरले पाणी'





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सीना नदीला महापूर आल्याने जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७२७ पैकी बार्शी, करमाळा, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ या तालुक्यातील ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे.  विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, संगणक, पुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. या तालुक्यातील १८१ अंगणवाड्यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

सीना-कोळेगाव, चांदणी, खासापूर या धरणातून व भोगावती नदीतून सव्वादोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्याने सीना नदीला महापूर आला होता. नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने २३ व २४ सप्टेंबरला शाळांना सुट्टी देण्यात आली होती. शाळांमध्ये देखील पाणी होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीनुसार सहा तालुक्यांतील ४३१ शाळांना महापुराचा फटका बसला आहे.

पाणी ओसरेल तसे त्या ठिकाणी दुरुस्ती, स्वच्छता केली जाणार आहे. तूर्तास, ज्या शाळांमधील वर्गखोल्यांचे छत गळत आहेत, ज्या शाळांमध्ये अजूनही पाणी आहे त्या ठिकाणच्या शाळा समाजमंदिर, मंदिरांमध्ये भरविल्या जात आहेत. पण, पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांची दप्तरे पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांना दप्तराविना शाळेत बसावे लागत आहे. त्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.  सीना नदीच्या महापुरामुळे जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे. शालेय साहित्य, पोषण आहार, ई-रेकॉर्ड, संगणक याचे नुकसान झाले असून अनेक वर्गखोल्यांचे छत गळत आहेत. त्यामुळे त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सोय पर्यायी ठिकाणी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या ४३१ शाळा तर एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या ५७५ अंगणवाड्यांमधील पोषण आहार पुराच्या पाण्यामुळे खराब झाला आहे. अनेक ठिकाणचा पोषण आहार वाहून गेला आहे. त्यामुळे या शाळा, अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी तातडीने पोषण आहाराची सोय करावी लागणार आहे. जेणेकरून, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील चूल पेटणार आहे.

५७५ अंगणवाड्यांना भेगा, अनेक ठिकाणी छताला गळती सीनेच्या काठावरील गावांमधील १८१ अंगणवाड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण ५७५ अंगणवाड्यांना भेगा पडल्या आहेत. अनेक अंगणवाड्यांचे छत गळत आहेत. पोषण आहाराचे धान्य देखील पाण्यात वाहून गेले तथा खराब झाले आहे. काही अंगणवाड्यांमधील फरशी उचकटली आहे. दुरुस्तीसाठी साधारण चार कोटी ६४ लाख रुपये लागणार आहेत.



Reactions

Post a Comment

0 Comments