Hot Posts

6/recent/ticker-posts

अनधिकृत बांधकामांमुळे ही परिस्थिती : आयुक्त ओम्बासे

अनधिकृत बांधकामांमुळे ही परिस्थिती : आयुक्त ओम्बासे


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात बुधवारी मध्यरात्री पासून गुरूवारी सकाळपर्यंत ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला. शहराची वर्षाची पावसाची सरासरी पाचशे ते सहाशे मिलिमीटर असताना एका रात्रीत तब्बल ११८ मिलिमीटर पाऊस झाला. शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नाल्यांचा मार्ग बदलला. तसेच अनधिकृत बांधकामांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. भविष्यातील धोका टाळण्यासाठी अतिक्रमित बांधकामांना दोन दिवसात नोटिसा देऊन ही बांधकामे जमीनदोस्त केली जाणार असल्याचे ओम्बासे यांनी सांगितले.


शहरांमध्ये एकूण ५० नैसर्गिक नाले आहेत. त्यापैकी १९ नाल्याची दुरुस्ती झाली आहे. उर्वरित नाल्यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपये मंजुर केले आहेत. पावसाळ्यानंतर या नाल्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र या नाल्यावर ३४ ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत. नाल्याच्या सहा मीटर परिसरात कोणतीही बांधकाम करता येत नाहीत. तरी देखील नैसर्गिक नाल्यांचे मार्ग बदलून अतिक्रमण करण्यात आले. परिणामी पावसाच्या पाण्याला वाट मिळाली नाही. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरले. या सर्व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना दोन दिवसात नोटीस बजावून ही अतिक्रमणे काढली जाणार असल्याचे ओम्बासे यांनी सांगितले.


शहरात पावसामुळे पडझड, जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. सकाळच्या सत्रामध्ये महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने पाणी शिरलेल्या भागात मदतकार्य केले. तहसील कार्यालयाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. आपत्कालिन यंत्रणेतील एक कर्मचारी गैरहजर होता. यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली.


 चौकट 

अदिला नदी रेखांकनाचे काम ४० टक्के पूर्ण

अदीला नदीच्या रेखांकनाचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला १५ दिवसात अहवाल मिळणार आहे. त्यानुसार येथील नदीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार असल्याचे ओम्बासे यांनी सांगितले. अदिला नदीपात्रात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यावरही कारवाई करणार असल्याचे ओम्बासे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments