कलंत्री व खरादींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 17, 2025

कलंत्री व खरादींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

 कलंत्री व खरादींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री आणि एमआयएम पक्षाचे सोलापूर महापालिकेतील गटनेते रियाज खरादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश मुंबई येथे पार पडला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे कृषिमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी विशेष पुढाकार घेतला.


राजेंद्र कलंत्री हे सोलापूर शहरातील परिचित आणि अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. उपमहापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामांत सक्रिय सहभाग घेत शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर रियाज खरादी हे एमआयएम पक्षाचे सोलापूर महानगरपालिकेतील गटनेते म्हणून कार्यरत होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे शहरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.


या दोन्ही नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे सोलापूर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः अल्पसंख्यांक समाजासह सर्वसामान्य मतदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


पक्षप्रवेशानंतर उपस्थित नेत्यांनी सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येईल, तसेच विकासकामांसाठी एकत्रितपणे काम केले जाईल, असे संकेत दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


या कार्यक्रमाला मुंबईसह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून, आगामी काळात शहराच्या राजकारणावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages