Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा- सुनील तटकरे

 सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा- सुनील तटकरे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा, राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे यांनी दिले.
  सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. तीन दिवसात तब्बल ४१२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे उत्साह दुणावला आहे.आणखी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात येत आहेत. अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्यामुळे हा आकडा ५०० पार जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
   शुक्रवारी मुंबईमध्ये कुलाबा येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे बोलत होते.
   महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील इच्छुकांचा सर्व्हे करण्यासाठी टीम येणार आहे. त्यांच्याकडून प्रदेशला अहवाल येईल. त्यानंतर उमेदवार निश्चित होतील, असे सांगत स्थानिक पातळीवर महायुती करण्यासंदर्भातला निर्णय संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे घेतील. तो निर्णय अंतिम मानून निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे, असेही प्रदेशाध्यक्ष तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.सोलापुरात इच्छुकांचा आकडा ४०० पार झाल्याबद्धल सोलापुरातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूर महानगरपालिकेसाठी सोलापूरच्या राष्ट्रवादी पक्षाच्या इतिहासात प्रथमच ४१२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अहवाल सादर केला.
संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि सह संपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी सोलापुरात जातीने लक्ष घातल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सोलापुरात राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले.
   सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगत निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्य दिग्गज नेत्याच्या जाहीर सभा होण्यासाठी पक्षाने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली.
  सोलापुरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज मंडळी आपल्या पक्षात येऊ इच्छितात त्यामुळे पक्षाला आणि महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढण्यास निश्चित त्यांची मदत होईल, असे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रदेश बैठकीत सांगितले.
 या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आणि जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments