Hot Posts

6/recent/ticker-posts

'एमडी' ड्रग्जच्या तपासासाठी सोलापूरचे पोलिस मुंबईला रवाना

 'एमडी' ड्रग्जच्या तपासासाठी सोलापूरचे पोलिस मुंबईला रवाना




 सोलापूर, कलबुर्गीत आठजण जेरबंद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुंबईतून एमडी ड्रग्ज सोलापुरात आणून कलबुर्गी व सोलापूर शहराजवळील गावांमध्ये पुरवठा करणाऱ्या आठ जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ते संशयित आरोपी मुंबईतून नेमके कोणाकडून व कोणत्या भागातून ते ड्रग्ज घेत होते, याच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.

त्यातून ड्रग्ज पुरवठ्याचे मोठे रॅकेट समोर येईल, असे अधिकारी सांगत आहेत.

मुंबईतून पुणेमार्गे सोलापूरकडे येताना पाकणी फाट्याजवळ ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना जेरबंद केले होते. त्यांच्याकडील तपासानंतर आणखी चौघांना अटक झाली होती. त्यात सोलापूर शहरातील मोहसीन इस्माईल शेख, इरफान इस्माईल शेख, मुजफ्फर अब्दुल जब्बार शेख, मुबारक राजअहमद शेख व अस्लम अहमद युसुफ बागवान या पाच जणांचा समावेश होता. तर त्यांच्यासोबत कलबुर्गीतील याकुब अली बागवान, मोहम्मद मतीन हाजी शेख आणि बाबा फरीद अब्दुल सलिम बागवान यांचाही समावेश आहे.

कलबुर्गीतील तिघांची ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांसमवेत थेट ओळख नसल्याने मोहसीन याने त्यांनाही सोबत नेले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. ते तिघेजण कधीपासून या अवैध व्यवसायात होते, त्यांनी कोठे कोठे ड्रग्ज पुरवठा केला आहे, याचाही तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. याशिवाय या अवैध व्यवसायात त्या सर्वांना मदत करणारे चौघेजण पोलिसांच्या कारवाईनंतर मोबाईल बंद करून पसार झाले आहेत. त्यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूरसह दक्षिण, उत्तर तालुक्यात पुरवठा

एमडी ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम चार हजार रूपये असून ते ड्रग्ज पाण्यात, गुटखा, माव्यात व खायच्या पानात टाकून घेतले जाते. सोलापूर शहराबरोबरच दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील (सोलापूर शहराजवळील गावे) सुमारे ४० ते ५० जण नियमित ते ड्रग्ज घ्यायचे. त्यांना हे सप्लायर ड्रग्ज आणून द्यायचे, अशाही बाबी तपासात समोर आल्या आहेत. या अवैध व्यवसायात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध संशयितांच्या मोबाईलवरून घेतला जात आहे. त्यासाठी सर्वांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments