थकीत बिलासाठी कंत्राटदार उपोषणाचा मार्ग स्वीकारणार
सोलापूर (काटूसत्य वृत्त):- राज्य शासनाकडे कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. मागणी करूनही देखल घेतली जात नसल्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात कंत्राटदार मोठा निर्णय घेणार आहेत. सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी समाज कल्याण सभागृहात झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या
विरोधात उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उपोषण मुंबईत आझाद मैदानावर की जिल्हा पातळीवर करायचे, याबाबतचा निर्णय ११ ऑगस्ट रोजी घेण्याचे या बैठकीत ठरले.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार व राज्य अभियंता संघटना व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना, सोलापूर जिल्हा मजूर संस्था, सोलापूर महापालिका कॉट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या विविध संघटनांची बैठक सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समाज कल्याण सभागृहात झाली. या बैठकीत थकीत बिलापोटी राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा
मोठा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये कोट्यवधीचे कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत. सहा ते आठ महिन्यांपासून प्रलंबित
देयकेच मिळत नाहीत. निधी शासनाकडून उपलब्ध केला होता, त्यांचे वाटप नियमबाह्य पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांनी केले. कामांचे वाटप ही शासन निर्णयास झुगारून बेकायदेशीर केले, यावर चर्चा
करण्यात आली. त्याशिवाय निविदा प्रक्रियेमध्ये चुकीच्या पद्धतीने हेतुपुरस्सर एखाद्याला काम देणे ठरवून बाद करणे, सहा-आठ महिने निविदाच उघडण्यात न येणे, निविदा प्रक्रियामध्ये ठरवून मानवनिर्मित हेतुपुरस्सर अटी घालणे, ग्रामपंचायतीस कामे देऊ नये, असा मुंबई हायकोर्ट व दिल्ली सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना कामे दिली जात असल्याने कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या सर्व विभागाकडील प्रलंबित देयके व इतर अडचणीबाबत शासनाच्या विरोधातील ठोस निर्णय सोमवार, ११ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा व राज्य पदाधिकारी व संचालक यांच्याबरोबर चर्चा करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदारचे राज्य अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले, बिल्डर्स
असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राज्य अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सोलापूर जिल्हा मजूर सहकारी संस्था अध्यक्ष शंकरराव चौगुले, उपाध्यक्ष कांतीलाल डुबल, सचिव कैलास लांडे, संघटक नरेंद्र भोसले, सोलापूर जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद तोडकरी यांनी दिली.
0 Comments