माढा लोकसभा मतदारसंघातील सह्याद्री पर्वतरांगात असणाऱ्या क्षेत्रात हवामान बदलाचा अभ्यास करा-खा.धैर्यशील मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे भारतीय मौसम विज्ञान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांची भेट घेऊन मतदारसंघातील पर्यावरण आणि हवामान बदलाच्या तीव्र परिणामांबाबत सविस्तर चर्चा केली. सह्याद्री पर्वतरांगात असणाऱ्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा कृषी,मृदा, जलस्रोत आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगतिले.
खासदार मोहिते-पाटील यांनी या समस्येच्या अभ्यासासाठी भारतीय मौसम विज्ञान विभागाकडून जलसंरक्षण,मृदासंवर्धन तसेच वनीकरणासंबंधी विशेष संशोधन अभ्यास करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी महासंचालकांना निवेदन सादर केले. या निवेदनात माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात यावे म्हणून सांगितले.
"हवामान बदलामुळे आमच्या भागातील शेती आणि जलस्रोतांवर मोठा परिणाम होत आहे. पावसाचे प्रमाणषजलवायु परिवर्तन बदलले आहे, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि जैवविविधतेवर होतो. भारतीय मौसम विज्ञान विभागाच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने, हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करू शकतो," असे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.
महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करण्यात येईल असे सांगितले.माढा लोकसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी खासदार मोहिते-पाटील यांच्या यामागणीचे स्वागत केले आहे.
0 Comments