बाळे येथील ढेपे शाळेत पाणी;
संतोषनगर आणि तोडकर वस्तीतील ८० घरे जलमय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषतः डेपो शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळे दोन दिवस विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी जाहीर करावी लागली. पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण आवार जलमय झाले आहे.
संतोषनगर व तोडकर वस्ती या भागांमध्ये जवळपास ८० घरे पाण्याखाली गेली असून, काही घरांत ड्रेनेजचे घाण पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांच्या तक्रारीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून नालेसफाई न झाल्यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संतोषनगरमधील अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
बार्शी रोड परिसरातही पावसाचे पाणी साचून अनेक रस्ते तळ्याचे स्वरूप धारण करत आहेत. वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी वाहने बंद पडली आहेत. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
नागरिकांनी वेळेवर नालेसफाई केली असती, तर आज ही परिस्थिती ओढवली नसती, अशी भावना व्यक्त केली आहे. बाळे परिसरातील नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले आहे.
या संपूर्ण परिस्थितीकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
0 Comments