सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील शेतक-यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादीत होणा- या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतक-यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतक-यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्यवेळी पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने त्या शेतक-यांचे देशाबाहेरील अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये युरोप- नेदरलँड, जर्मनी, फ्रांस, स्वित्झलँड, इस्त्राईल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया फिलीपाईन्स, चीन, द. कोरीया, इत्यादी संभाव्य देशाची निवड करण्यात आली आहे.
या अभ्यास दौ-यासाठी शेतक- यांनी दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज कृषी अधीक्षक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अभ्यास दौ-यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्टया तंदरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, वैध पासपोर्ट असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसावा तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे, यामध्ये शेतक-यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपया यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयाला ५ शेतक-यांचे लक्षांक असून यामध्ये जिल्हयात एक महीला शेतकरी व एक केंद्र व राज्य स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतक-याची निवड करण्यात येणार आहे. दिलेल्या लक्षांक मर्यादेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार शेतक-यांची निवड केली जाणार आहे. शेतकरी अभ्यासदौ-याकरिता शेतक-यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तसेच अर्ज केलेले शेतकरी ४ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दुपारी २ वाजता उपस्थित रहावे. प्राप्त अर्जातून जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
0 Comments