Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीची वाढली नशा

 सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीची वाढली नशा




माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथेच फाशी घेईन असह्य विवाहितेचा हातभट्टी विक्रेत्याला इशारा  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पतीचा दूध संकलनाचा व्यवसाय, कधी शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या तरुणाचा संसार सुखाचा सुरू होता. पण, तरुणाला गावात खुलेआम विक्री होणाऱ्या हातभट्टीच्या दारुचे व्यसन लागले आणि संसारात विघ्न आले.    आता मोठी मुलगी दहावीला, छोटी मुलगी आठवीत आणि मुलगा पाचवीच्या वर्गात असताना देखील तो तरुण मद्यधुंद असतो. यामुळे वैतागलेली विवाहिता हातभट्टी विक्रेत्याकडे थेट गेली आणि 'तुम्ही यापुढे माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथेच फाशी घेऊन आत्महत्या करीन' असा इशारा दिला. ही व्यथा आहे उपळाई ठोंगे (ता. बार्शी) या गावातील विवाहितेची.

गावागावात खुलेआम विक्री होणाऱ्या हातभट्टी दारूने शेकडो तरुणांचे सुखाचे संसार मोडले आहेत तर अनेक नवविवाहितांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. बहुसंख्य गुन्ह्यात कौटुंबिक वादाचे कारण देखील हातभट्टीची दारूच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना अशी गावे दत्तक देऊन 'ऑपरेशन परिवर्तन' राबविले होते. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 'हातभट्टी मुक्त' गाव अभियान देखील सुरू आहे. तरीदेखील, ज्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव केले, अशा ठिकाणी खुलेआम हातभट्टीतील दारू विकली जात असल्याची उदाहरणे आहेत. उपळाई ठोंगे येथील त्या तरुणाचा १७ वर्षांपूर्वी विवाह झाला, पती-पत्नीच्या संसारात पहिल्या मुलीने आनंद बहरला.

दुसरी मुलगी, तिसरा मुलगा झाला, तरुणावर कुटुंबाची जबाबदारी वाढली आणि त्याला पत्नी देखील साथ देऊ लागली. मात्र, हातभट्टीच्या नादी लागलेला तरुण कर्जबाजारी झाला आणि त्या विवाहितेला मुला-मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गावांसाठी बीट अंमलदार नेमलेले असताना देखील गावांमध्ये खुलेआम हातभट्टी विक्री करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्या विवाहितेचा आहे. आत्महत्येचा इशारा देणाऱ्या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


हातभट्टीचा अवैध व्यवसाय १०० कोटींचा!

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, बार्शीसह अन्य तालुक्यांमध्ये सुमारे 23 ठिकाणी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर हातभट्टी तयार केली जाते. मुळेगाव तांडा तर वर्षानुवर्षे देशभरात अवैध हातभट्टीसाठी ओळखला जातो. ही ओळख पुसण्याचा प्रयत्न तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'ऑपरेशन परिवर्तन' या विशेष मोहिमेच्या माध्यमातून केला. पण, त्यानंतर या मोहिमेचा प्रभाव कमी झाला आणि हातभट्ट्या पुन्हा पेटल्या. ग्रामीण पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्षभराच्या कारवाईत सुमारे ३० ते ३५ कोटींची हातभट्टी व गुळमिश्रित रसायन नष्ट केले जाते. याशिवाय चोरीने विक्री होणाऱ्या हातभट्टीतील उलाढाल अंदाजे 65 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे दिसते.

Reactions

Post a Comment

0 Comments