संविधान व लोकशाहीसाठी लढणार्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
- आ. रोहित पवार
पुणे (कटूसत्य वृत्त):- कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची सनद महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने रद्द केल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सरोदे यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “अॅड. असीम सरोदे यांनी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली आणि आवाज उठवला, त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची सनद रद्द केली जात आहे. परंतु अशा निर्णयांची चिंता करण्याची गरज नाही. या लढ्यात भविष्यातही अनेक अडचणी येतील, पण माफी मागणार नाही, असा बाणेदार संदेश देऊन त्यांनी दाखवून दिलं की ते कुणाच्याही दबावाखाली गुडघे टेकणार नाहीत.”
पवार पुढे म्हणतात, “बहुतांश वकील आणि आम्ही सर्वजण अॅड. सरोदे यांच्या पाठीशी आहोत. संविधानावर, लोकशाहीवर, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुठलाही आघात होऊ देणार नाही. लढूया…!” अशी भावनिक हाक त्यांनी दिली आहे.
अॅड. असीम सरोदे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर नागरिक, कार्यकर्ते आणि वकील मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आहेत. सरोदे यांनी नेहमीच अन्यायग्रस्त आणि वंचित घटकांच्या बाजूने उभं राहत संविधानिक मूल्यांची जपणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या सनद रद्दीकरणाचा निर्णय हा केवळ एका वकिलावरील कारवाई नसून, विचारस्वातंत्र्य आणि न्यायासाठी लढणाऱ्यांविरुद्धचा दडपशाहीचा प्रकार असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकरणावरून आता राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
.jpg)
0 Comments