असीम सरोदे यांची सनद रद्द; “संविधानिक आवाज दडपण्याचा प्रयत्न”
पुणे (कटूसत्य वृत्त):- कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची सनद महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने रद्द केल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाचा आम आदमी पार्टीने तीव्र निषेध करत “हा न्यायासाठी लढणाऱ्या संविधानिक आवाजाला दाबण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप केला आहे.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले की, “न्यायव्यवस्थेतील उणिवा दाखवण्याची जबाबदारी फक्त नागरिकांचीच नाही तर वकिलांचीही असते. न्यायव्यवस्था निष्कलंक ठेवण्यासाठी टीका करणे, प्रश्न विचारणे ही लोकशाहीतील आवश्यक प्रक्रिया आहे. तरीदेखील असीम सरोदे यांच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवून त्यांची सनद रद्द करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.”
किर्दत यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. “भाजपच्या एका वकिलाने केलेल्या तक्रारीवरून बार कौन्सिलने केलेली कारवाई ही मुळात राजकीय खेळी आहे. न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना गप्प बसवण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी “तारीख पे तारीख” या प्रणालीवर भाष्य करत न्याय मिळण्यात होणाऱ्या विलंबाबद्दल आकडेवारी मांडली होती, अशी आठवण करून देत किर्दत म्हणाले, “न्यायालयातील दुटप्पी निकष हेच दाखवतात की, व्यवस्थेतील उणिवांकडे लक्ष वेधणाऱ्यांवर कारवाई होते, पण चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणाऱ्यांवर नाही.”
असीम सरोदे यांनी दीर्घकाळ न्यायासाठी झटणाऱ्या पीडित, शोषित, आणि अन्यायग्रस्तांचा आवाज न्यायालयात पोहोचवण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांची सनद रद्द करणे हे सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्या सर्वांसाठी चिंताजनक असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
“न्यायव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम आदमी पार्टी ठामपणे उभी आहे. असीम सरोदे यांच्यावरील कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे किर्दत यांनी स्पष्ट केले.
.jpg)
0 Comments