गट रचनेनंतर आरक्षणाकडे लक्ष
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या तीन वर्षांपासून उत्सुकता असलेल्या सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या गट-गणांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला. प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. आता या आराखड्यावरील हरकती, त्यावरील सुनावणी व अंतिम आराखडा येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. परंतु इच्छुकांना खरी प्रतीक्षा आहे, ती आरक्षण सोडतीची. गेल्या दोन निवडणुकांमधील आरक्षणाचा विचार करून ही सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची यापूर्वीची निवडणूक याचिकेवरील मे 2025 मध्ये निकाल लागला. या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गट-गणांसह प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गट-गणाचा प्रारूप आराखडा दि. 14 जुलै रोजी प्रसिद्ध झाला. यात सोलापूर जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद गट आणि 136 पंचायत समिती गणांचा समावेश असून, 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी आणि तहसीलदारस्तरावर हरकती घेता येणार आहे. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखड्यात माळशिरसमध्ये दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गणाची संख्या कमी झाले आहेत. तर उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीची गावे वगळून हा आराखडा तयार झाला. गट-गणातील गावांची माहिती इच्छुकांकडून घेण्याचे काम सुरू आहे.
8 वर्षांनंतर होणार निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची यापूर्वीची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. सभागृहाची मुदत २१ मार्च 2022 मध्ये संपली. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणावरून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आत आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याने येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.
खुला गट व गणावर पुन्हा तेच आरक्षण निघण्याची शक्यता असू शकते, पण शंभर टक्के खुला कोणता गट-गण राहील, हे ठामपणे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे जे गट किंवा गण खुले राहतील, त्या ठिकाणीच मोठी चुरस असणार आहे. त्यामुळेच अशा गट-गणांवर इच्छुकाचा डोळा आहे. जिल्हा परिषद सदस्य होणे म्हणजे राजकीय जीवनातील श्रीगणेशासाठी खूप मोठी संधी असते. त्यासाठी अनेकांनी आत्तापासून मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
गट-गणांतील गावांची माहिती समजल्याने इच्छुकांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर अधिक गती येणार आहे. प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या गट किंवा गणात समाविष्ट गावे, त्या गावांतील प्रमुख नेते, पक्षनिहाय वातावरण याची माहिती घेण्याचे काम प्रमुख इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाले आहे.
0 Comments