सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मे महिन्यातच जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जूनअखेरीस विश्रांती घेतली. जुलै महिन्यात मोजकाच पाऊस पडला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीही सायंकाळपासून जोरदार पावसाने शहरासह परिसरात हजेरी लावली.यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्याच्या काही भागात जुलै महिन्यात पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आषाढ महिना तसा नेहमीच कमी पावसाचा व वारे वाहणारा असतो.आता श्रावणाच्या तोंडावर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सोमवारी व मंगळवारी सायंकाळी पावसाच्या सरी धावून आल्या.रात्री आठनंतर शहरात मोठ्या पावसाला सुरवात झाली. शहरात ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.मागील काही दिवसांत उन्हाळ्याचा अनुभव भर पावसाळ्यात सुरू होता. आता पावसाला सुरवात झाल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या सोलापूरकरांना गारव्याचा दिलासा मिळाला आहे.
शहरातील बत्ती गुल सोलापुरात मंगळवारी सायंकाळी पाऊस सुरू होताच शहरातील अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती. बाहेर जोरदार पाऊस व घरात लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सखल भागातील रस्त्यावर तर काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यातच लाईट गेल्याने अशा भागातील नागरिकांचे हाल झाले.
0 Comments