पत्रकार प्रशांत माने लिखित 'लोकाभिमुख पत्रकारिता' पुस्तकाचे प्रकाशन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराच्या आत असलेले विमानतळ किती दिवस टिकणार ? आम्ही आडवे घालणार नाही. सत्ता त्यांची आहे त्यांनीच मार्ग काढला पाहिजे. आम्ही कोणत्याही कामाचे श्रेय घेतले नाही. बोरामणी विमानतळासाठी प्रयत्न केले. जागा दिली. आमचे नाव बाजूला ठेवा पण सोलापूर शहराच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीयस्तराचे बोरामणी विमानतळ झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. संपादक प्रशांत माने हे चिंतनशील पत्रकार आहेत. त्यांचे लोकाभिमुख पत्रकारिता पुस्तक वाचनीय असून नव्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
पत्रकार प्रशांत माने लिखित आणि जागृती प्रकाशन प्रकाशित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज रविवारी होटगी रोड गांधीनगर येथील हेरिटेल गार्डन येथे प्रमुख अतिथी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. धनंजय माने, दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे, ज्येष्ठ संपादक तथा स्वागताध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते थाटात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, निवडणुकीत ज्यांना विजय मिळेल असे वाटते, तो पडला जातो. सोलापुराकरांनी मला सर्वसाधारण जागेवर दोनदा खासदार केले मात्र राखीव जागेवर माझा पराभव झाला. आम्ही प्रभावीपणे काम केले. लोकांनी ते स्वीकारले नाही. नाराज न होता काम केले पाहिजे. ते आम्ही करत आहोत. लोकशाहीत चिंतन केले पाहिजे. सोलापूरला रंगाअण्णा वैद्य यांच्यासह अभ्यासपूर्ण पत्रकारांचा मोठा वारसा आहे. रंगाअण्णा वैद्य यांनी काल आणि आजच्या पिढीला पत्रकारिता कशी असावी याचा आदर्श घालून दिला. पत्रकार प्रबोधन करणारा असला पाहिजे. त्याचप्रमाणे पत्रकार प्रशांत माने हे चिंतनशील पत्रकार आहेत. तीस वर्षाच्या पत्रकारितेत त्यांनी जे अनुभवले, लिहिले ते त्यांनी पुस्तकातून मांडले आहे. त्यांचे विचार सामाजिक समतेचे आहेत. पत्रकारिता करताना सार्वजनिक जीवनात लोकांना काय पाहिजे ते दिले पाहिजे. तशा उपयुक्त बातम्या देण्याचे काम पत्रकार माने यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि प्रबोधन केले. पत्रकार प्रशांत माने यांचे पुस्तक नव्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पत्रकारितेचा वारसा नसतानाही त्यांनी तब्बल तीस वर्षात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडले. महसूल खात्यातील योजनांच्या अनियमिततेवर प्रकाश टाकला. त्याची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यावर चर्चा झाल्या. अनुदान थेट बँकेच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली. पत्रकार सुद्धा चांगल्या गोष्टी करू शकतात हेच या माध्यमातून दाखवून दिले.
दैनिक 'तरुण भारत'चे कार्यकारी संचालक दिलीप पेठे यांनी प्रशांत माने यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुस्तकांने दैनिक तरुण भारतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवद्गार काढले. स्वागताध्यक्ष राजा माने म्हणाले, लोकाभिमुख पत्रकारिता हा सोलापूरच्या पत्रकारितेचा आत्मा आहे. विविध विकास कामे आणि प्रश्नांसाठी सोलापूरच्या पत्रकारांनी लोकप्रतिनिधींच्या दहापट शक्ती पणाला लावली. पत्रकारितेतील सुवर्णकाळ आणि अनुभवला आहे. इशू बेस पत्रकारिता राहिली आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आज डिजिटल मीडियाचे युग आहे. बिझनेस मॉडेल पूर्ण बदलले आहे. त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पत्रकारितेचे मूल्य, सामाजिक बांधिलकीचा विसर न पडता कार्यरत राहिले पाहिजे.
लेखक प्रशांत माने यांनी प्रस्ताविकात लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तक लेखनामागील उद्देश स्पष्ट केला. या पुस्तकातून बातम्यांची कात्रणे देखील नवोदित पत्रकारांना अभ्यासासाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. पत्रकारांचे राजकीय आणि सामाजिक ऋणानुबंध कसे असावेत ? यावर देखील पुस्तकातून छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. वाचकांसह नवोदित पत्रकारांच्या पसंतीस पडेल, असे प्रशांत माने यांनी सांगितले.
सूत्रसंचालन पल्लवी गंभीरे यांनी केले. अक्षय माने यांनी आभार मानले. याप्रसंगी पत्रकारितेसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments