शेतकऱ्यांची ऊसबिले तत्काळ द्यावीत'; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आरआरसीच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी उदासीन असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.
ऊस गाळप हंगाम संपून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसबिले जमा केली नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता. १) कृषिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. साखर कारखानदार ऊसबिले देत नसल्याने शेतकऱ्यांना कारखान्याकडे वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
साखर आयुक्तांनी सोलापूर जिल्ह्यातील गोकूळ शुगर, जयहिंद शुगर, मातोश्री शुगर, सिद्धेश्वर सहकारी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, इंदरेश्वर शुगर या सात साखर कारखान्यावर आरसीसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांचा सध्या पेरणीचा हंगाम सुरू असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मशागत, बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनाना अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आरसीसी आदेशाची अंमलबजावणी करून तत्काळ ऊसबिले जमा करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, विशालसिंह पाटील, मोहसीन पटेल, इक्बाल मुजावर, शहाजी पवार, शहाजी सोमवंशी, मकबूल मुल्ला, नागनाथ सुरवसे, नशिर पटेल, नानासाहेब मोरे उपस्थित होते.
आरसीसी कारवाईकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांनी आरसीसीच्या आदेशाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना ऊसबिले जमा करायला हवी होती. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून जिल्हाधिकारी हे आरसीसीच्या कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी शेतकरी संघटनेने केला.
0 Comments