मालवाहतूकदारांचा संप सुरु, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प; नागरिकांची गैरसोय
मुंबई (कटूसत्य वृत्त):- जड-अवजड वाहतूकदारांच्या मागण्यांवर मंत्रालयीन पातळीवर मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यभरातील अवजड वाहतूकदार संप बुधवार पासून सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी मुंबईतील ट्रक, कंटेनर, टेम्पो वाहतुकीवर ४५ ते ५० टक्के परिणाम झाला.
तसेच मुंबईत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत २० टक्के घट दिसून आली.
आजपासून मालवाहतूक करणारे ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर चालक बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे राज्यभरातील अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले आणि औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हा संप सुरू झाल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. तर सर्वसामान्य जनतेची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार आहे.
महाराष्ट्रातील मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीद्वारे होणाऱ्या दंडवसुलीविरोधात आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. परिवहन विभागाने मागण्यांवर ठोस उपाययोजना न केल्याने वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, प्रवासी वाहतूक आणि शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी तूर्तास संपातून माघार घेतली आहे. दोन दिवसांनंतर संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे असोशिएशनकडून सांगण्यात आले आहे.
अवजड वाहतूकदार संपावर गेल्यामुळे बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण आणि शहरी भागात होणारा पुरवठा साखळी खंडित झाल्याने किमतीत वाढ होऊ शकते. सरकारने तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे. अन्यथा, जनजीवनावर गंभीर परिणाम होईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
चौकट -
मालवाहतूकदारांच्या संपामुळे मुंबईत जवळपास ५० टक्के वाहने बंद आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकित २० टक्के घट झाली आहे. हा संप सुरु राहिल्यास जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.
- राजेंद्र वणवे , अध्यक्ष , जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशन
चौकट -
मालवाहतूक दारांच्या संपाबाबत परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा झाली. परंतु या चर्चेत तोडगा निघाला नाही त्यामुळे संप कायम असणार आहे.
- उदय बर्गे , अध्यक्ष , मालवाहतूकदार बचाव समिती
0 Comments