पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली शिरले आहेत"
मनिषा कायंदेंचा सभागृहात गंभीर आरोप
मुंबई (कटूसत्य वृत्त):- पंढरपूरची वारी जगभरात प्रसिद्ध आहे. या वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात.
मात्र, असं असताना काही अर्बन नक्षलवादी वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हलं आहे. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता, आमदार कायंदे यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मनिषा कायंदे नेमकं काय म्हणाल्या?
देव आणि धर्म या गोष्टी हे लोक मानत नाहीत, तो त्यांचा अधिकार आहे. हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार मात्र केला जातो आहे. हे अर्बन नक्षली लोकांचा बुद्धीभेद करत आहेत. पंढरपूरची वारी अशी आहे जिथे कोणी कोणाला निमंत्रण देत नाही. वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसे पर्यावरण दिंडी, संविधान दिंडीसारख्या गोष्टी समोर आल्या आहेतस, पथनाट्य करतात, असे शो करतात. एक दिवस तरी वारी अनुभवा, हा माणूस कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. सासवड येथे ही लोकं पोहोचतात आणि त्यांच्या वारीचा रुट देखील आहे. त्यांनी जो क्युआर कोड दिलाय तो ब्लॅकलिस्टेड आहे, असं दिसतंय. पंढरपूरच्या वारीचा हे लोक गैरफायदा घेत आहेत, अशी माहिती मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिली. याबाबत आदित्य ठाकरेंचंही वक्तव्य समोर आलं आहे.
फेक नरेटिव्ह पसरवणारे हे लोक नाहीत ना?
मनिषा कायंदे म्हणाल्या काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि आम्ही देखील सांगितलं ही या गोष्टीला आळा घाला. २०१० आणि २०११ पासून या लोकांवर गुन्हे नोंद आहेत. जामिनावर असलेले लोकं देखील वारीत येत आहेत, अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली हे काही प्रकार सुरु आहेत, असा आरोप करत कायंदे यांनी अंनिसकडे बोट दाखवले आहे. वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. वारीचा गैरफायदा घेऊ नये हाच उद्देश आहे. संविधानाच्या नावाखाली फेक नरेटिव्ह पसरवणारे हे लोक नाहीत ना? असाही सवाल मनिषा कायंदेंनी विचारला.
0 Comments