मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इलेक्ट्रिक चुली उपलब्ध करून देण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इलेक्ट्रिक चुली उपलब्ध करून देण्याची मागणी

 मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इलेक्ट्रिक चुली उपलब्ध करून देण्याची मागणी




सोलापूर(कटूसत्य वृत्त):-– मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅसच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून मोफत किंवा अनुदानित इलेक्ट्रिक चुली उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांना देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा असल्याने युद्धाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यपूर्वेतील हा प्रदेश जगातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे मोठ्या प्रमाणावर तेल आणि वायूची वाहतूक होत असते. या मार्गात अडथळे निर्माण झाल्यास जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

भारत हा देश मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू परदेशातून आयात करतो. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात गॅस टंचाई निर्माण झाल्यास सामान्य नागरिक, विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांसाठी पर्यायी उपाययोजना म्हणून ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुंबांना शासनामार्फत मोफत किंवा अनुदानित दरात इलेक्ट्रिक चुली (इंडक्शन/हॉट प्लेट) उपलब्ध करून देण्याची योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या योजनेमुळे स्वयंपाकासाठी गॅसवरील अवलंबित्व कमी होईल, संभाव्य गॅस टंचाईच्या काळात नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध होतील तसेच गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांच्या हिताचा विचार करून शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रयत क्रांती संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या प्रसंगी याप्रसंगी उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष शहर वैभव गंगणे अमोल पाटील , तुकाराम साठे रोहित पाटील रेवा सुतार सचिन चलवादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages