शेतकऱ्याला धड मरूही द्यायचे नाही आणि जगूही द्यायचे नाही!” – आ. उत्तमराव जानकर यांचा सरकारवर हल्लाबोल
वेळापूर (कटूसत्य वृत्त): शेतकऱ्याला धड मरूही द्यायचे नाही आणि जगूही द्यायचे नाही, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून सरकारने शेतकरी, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी करत आमदार उत्तमराव जानकर यांनी विधानसभेत सरकारवर तीव्र टीका केली.
मुंबई येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. उत्तमराव जानकर यांनी आक्रमक भाषण करत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्र आलबेल असल्याचे चित्र दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात राज्य अधोगतीकडे चालले आहे, असा आरोप त्यांनी केला.
आरोग्य व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले की, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. गरीब माणसाला गंभीर आजार झाला तर अनेक सरकारी योजनांमध्ये त्याचे नावच नसते. एका आजाराच्या उपचारासाठी शेतकऱ्याला आपली जमीन किंवा घर विकावे लागते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात प्रभावी आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. डिजिटल शिक्षणाच्या घोषणा करणाऱ्या सरकारने किमान प्रत्येक शाळेत एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
माळशिरस तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्य आळंदी–पंढरपूर पालखी महामार्ग वगळता तालुक्याला जोडणारा एकही रस्ता व्यवस्थित नसल्याचे सांगत कंत्राटदार आणि सरकारी यंत्रणेमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवले.
राज्यात मागील वर्षी भरपूर पाऊस झाला असतानाही माळशिरस तालुक्यातील सुमारे ७० गावांना आजही टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. ही परिस्थिती राज्यासाठी लाजिरवाणी असल्याचे ते म्हणाले. नवीन धरणे बांधणे शक्य नसल्यास किमान विद्यमान धरणांमधील गाळ काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी त्यांनी केली. केवळ दोन लाख रुपयांची कर्जमाफी देऊन शेतकरी वाचणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांना सवाल करत म्हटले की, केवळ निवडणुका जिंकणे आणि पैसा कमावणे एवढ्यापुरतीच व्यवस्था मर्यादित राहता कामा नये. सामान्य माणसासाठी सरकारकडे कोणते ठोस व्हिजन आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर “आमदार व्हायचं कशासाठी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

No comments:
Post a Comment