सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ५५० मिलीमीटर पाऊस पडतो. पण यंदा मे महिन्यात पहिल्यांदाच पावसाने हजेरी लावली. या महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ९२९.५ टक्के पाऊस पडला. ४५ अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या मे मध्ये धो-धो पावसाने ओढे, नाले वाहू लागले. या महिन्यात अवकाळीचा एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता सहसा पाऊस पडत नाही. जरी पडला तरी जिल्ह्यात सरासरी २५.१ मिमी इतका पडतो. परंतु, यंदा मे महिन्यात २३३.३ मिलीमीटर इतका पाऊस पडला. त्याची टक्केवारी सरासरीच्या ९२९.५ टक्के आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात मे महिन्यात पडणाऱ्या पावसाची सर्वसाधारण सरासरी ३२.७ मिमी इतकी असते. यंदा २९० मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. याची टक्केवारी ८८६ इतकी आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात मे महिन्यातील पावसाची सर्वसाधारण सरासरी १९.३ मिमी इतकी आहे. येथे २२२.५ मिमी म्हणजे ११५२.८ टक्के, बार्शी तालुक्यात पावसाची सरासरी २१.१ इतकी असताना २५५.२ मिमी म्हणजे १२०९.५ टक्के, अक्कलकोट तालुक्यात सर्वसाधारण २६.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना २०९.९ मिमी म्हणजे ७९२.१ टक्के इतका पाऊस पडला आहे.
मोहोळ तालुक्यात मे महिन्यातील पावसाची सर्वसाधारण सरासरी २६.४ मिमी इतकी असताना २११.२ मिमी इतका म्हणजे सरासरीच्या ७४३.७ टक्के तर माढा तालुक्यातील सर्वसाधारण पावसाची सरासरी २६.४ इतकी असताना २६६.१ मिमी इतका पाऊस पडला. याची टक्केवारी १००८ इतकी आहे.
करमाळा तालुक्याची मे महिन्यातील पावसाची सरासरी २५४ इतकी असताना तीस दिवसात तालुक्यात २६७.७ मिमी म्हणजे १०५३.५ टक्के, मंगळवेढा तालुक्याची मे महिन्यातील पावसाची सर्वसाधारण सरासरी २४.४ मिमी इतकी असताना १८५.१ मिमी म्हणजे ७५२.४ टक्के, पंढरपूर तालुक्याची सर्वसाधारण सरासरी २०.३ मिमी इतकी असताना १५५ मिमी म्हणजे ७६३.५ टक्के पाऊस पडला आहे.
यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा ४५ अंशाच्या दिशेने जाऊ लागला होता. तापमान वाढल्याने जिल्ह्यातील नागरिकांसह जनावरांची होरपळ सुरू झाली होती. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून सुरू झालेल्या ऐतिहासिक पावसाने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला. यापूर्वी कधीही मे महिन्यामध्ये असा पाऊस झाला नसल्याचे जाणकार नागरिक सांगत आहेत. आता शेतकऱ्यांना वाफशाची प्रतीक्षा आहे.
चौकट
माळशिरसमध्ये सर्वाधिक पाऊस
यंदा जिल्ह्यात मे महिन्यात सर्वाधिक पाऊस माळशिरस तालुक्यात पडला आहे. या तालुक्याची मे महिन्याची सर्वसाधारण सरासरी १६३ मिमी इतकी असताना २८९.९ मिमी म्हणजे १७७८ टक्के तर सांगोला तालुक्यात सर्वसाधारण पावसाची सरासरी ३०.३ मिमी इतकी असताना २२१.३ मिमी म्हणजे सर्वात कमी ७३०.४ टक्के इतका पाऊस पडला आहे.
नदी नाले वाहू लागले
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे पहिल्यादांच भीमा, nसीना, कासाळगंगा ओढा, नीरा, हरणा नदी, हिप्परगा तलावासह जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे वाहू लागले आहेत. त्यामुळे टँकरची संख्या कमी होण्याबरोबरच जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.
0 Comments