Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरीत ऑनलाइन दर्शनाचा काळाबाजार

 पंढरीत ऑनलाइन दर्शनाचा काळाबाजार


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने परजिल्ह्यातील तसेच परराज्यातील भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधा सुरू केली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेऊन काही खासगी एजंट दुसऱ्याच्या नावाने आधीच दर्शन बुकिंग करून सदर पास दोनशे ते तीनशे रुपयांना भाविकांना विक्री करत आहेत.


मंदिर समितीने काही वर्षांपूर्वी परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील भाविकांना तत्काळ दर्शन मिळावे यासाठी ऑनलाइन दर्शन बुकिंगची सुविधा सुरू केली. यामध्ये मंदिर समितीच्या वेबसाइटवरून कोणतीही व्यक्ती किमान तीन दिवस आधी आपल्या दर्शनाची तारीख व वेळ बुकिंग करू शकते. विशेष म्हणजे मंदिर समितीची ही योजना मोफत आहे. यासाठी एक रुपयाही देखील आकारला जात नाही. मात्र, या चांगल्या सुविधेचा काही खासगी एजंट गैरफायदा घेत असल्याचे काही दिवसांपासून प्रकर्षाने दिसत आहे.


सध्या शाळांना सुट्टी असल्याने पंढरीत रोज पन्नास हजारांहून अधिक भाविक दर्शनास येत आहेत. यापैकी अनेक भाविकांना तत्काळ दर्शन करायचे असते. अशा श्रीमंत, सुशिक्षित भाविकांना हेरून संत नामदेव पायरी व परिसरात काही एजंट दर्शन पासची विक्री करतात. दर्शनाची चौकशी करणाऱ्या भाविकांना तत्काळ दर्शन पाहिजे का अशी विचारणा करून दोनशे ते पाचशे रुपयांस एक याप्रमाणे पासची विक्री होत आहे.


मंदिर समितीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन दर्शन बुकिंग केल्यानंतर भाविक याची प्रिंट काढून ती संत तुकाराम भवन येथे दाखवल्यावर त्यावर शिक्का मारला जातो. हा शिक्का मारलेला पास दाखवून संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून त्या भाविकास दर्शनास सोडले जाते. मात्र, पासवर शिक्का मारण्यापूर्वी फोटोतील भाविक तोच आहे का याची पाहणी होत नाही. तसेच शिक्का मारल्यावर दर्शन मंडपातून सोडताना देखील कोणतीच पाहणी होत नाही. याचा एजंट फायदा घेत आहेत. कोणाच्याही नावाने पास

बुकिंग करून ते भाविकांना विक्री केले जातात. पास विक्री केल्यावर त्यावर जे नाव आहे तेच संत तुकाराम भवन येथे सांगा, असे सांगितले जाते. तत्काळ दर्शनाच्या लालसेने भाविक देखील चक्क खोटे बोलून विठुरायाचे दर्शन घेतात हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.


चौकट 

तिरुपतीच्या धर्तीवर पाहणी हवी

दिवसभरात तीन हजार ऑनलाइन पासद्वारे भाविकांना दर्शन दिले जात होते. मात्र, पास तीन हजार बुकिंग झाले तरी दर्शनाला मात्र दोन किंवा अडीच हजारच भाविक येतात. यामुळे मंदिर समितीने ऑनलाइनची संख्या ३ हजार ६०० केली आहे. परंतु याची तपासणी पध्दत सदोष आहे. तिरुपती बालाजीप्रमाणे पास बुकिंग केल्यावर त्यावरील बारकोडद्वारे बुकिंग करणारा व दर्शनाला आलेला भाविक याची तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच त्या भाविकाचे आधारकार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्र तपासणे देखील गरजेचे आहे. मात्र, अशी कोणतीही तपासणी पंढरीत होत नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments