सोलापूर(कटुसत्य वृत्त):- निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येणारी महापालिका निवडणूक सुरळीत पार पडेल, असा विश्वास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले असून त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील 'ड' वर्ग महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आयोग आणि शासनाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. २०११च्या जनगणनेप्रमाणे प्रभाग रचना करायची आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीत जी पध्दत अवलंबली होती त्याच पध्दतीने सर्व प्रक्रिया राबवली जाईल. एकूण २६ प्रभाग आहेत. त्यापैकी चोवीस प्रभाग प्रत्येकी चार सदस्यांचे असतील तर शेवटचे दोन प्रभाग तीन सदस्यांचे राहतील. एकूण नगरसेवकांची संख्या १०२ राहील, असेही आयुक्तांनी सांगितले.
प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे असे सांगून ते म्हणाले, याबाबतचे वेळापत्रक महापालिकेला प्राप्त झाले आहे. राज्यातील सर्व १९ 'ड' वर्गातील महापालिकांसाठी एकच वेळापत्रक आहे. त्याप्रमाणे प्रभाग रचना तयार करण्यात येईल. यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत. सध्या पावसाळा आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन काही गोष्टींची तपासणी केली जाईल. प्रारूप रचना झाल्यावर तो प्रसिध्द करण्यात येईल. लोकांच्या सूचना / हरकती मागवण्यात येतील, त्यावर सुनावणी होऊन अंतिम रचना
केली जाईल. त्याला शासनाची तसेच निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतदान यंत्रे वेगळी आहेत. लोकसभा, विधानसभेप्रमाणे व्हीव्हीपॅट नाहीत. या यंत्रांची पाहणी केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा सर्वात मोठा विषय आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या प्रशिक्षणाचा दिवस ठरवला जाईल. प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेत माझ्यासह पाचजण असतील. त्या समितीलाही शासनाची मान्यता घ्यावी लागेल, असेही आयुक्तांनी सांगितले.
विधानसभेसाठी वापरण्यात आलेली मतदार यादीच महापालिका निवडणुकीत वापरली जाईल. यादीतील चुका दुरुस्त करण्याचे काम निरंतर चालू राहणार आहे. आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मतदार यादी अद्ययावत केली जाईल. २०१७मध्ये महापालिकेने ही प्रक्रिया राबवली आहे. त्याचप्रमाणे यावेळीही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
0 Comments