सरकारी जागेवरील रुग्णालयांत रुग्णांना मोफत उपचार मिळावेत
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील अश्विनी, यशोधरा व मार्कंडेय ही रुग्णालये शासनाने नाममात्र दराने दिलेल्या भूखंडावर उभी आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये नियमानुसार गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत अशी मागणी संभाजी आरमारने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे. दरम्यान, लवकरच अशा रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी संभाजी आरमारला आश्वासित केले.
सरकारी भूखंडावर उभ्या असणाऱ्या या रुग्णालयांनी अटी व शर्तीनुसार गरीब स्रणांवर मोफत उपचार करणे कायदेशीर बंधनकारक आहे. मात्र, जमीन घेताना मान्य केलेल्या अटी व शर्ती पायदळी तुडवत नावाला धर्मादाय व सहकारी असणाऱ्या या रुग्णालयांनी गरीब रुग्णांकडे दुर्लक्ष केले आहे.
सरकारी स्णालयांची क्षमता संपल्याने आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कित्येक गरीब रुग्ण उपचाराअभावी दिवस कंठत आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याबाबत यापूर्वीदेखील संभाजी आरमारने प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासकीय स्तरावर या संवेदनशील विषयाकडे दुर्दैवाने डोळेझाकच होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच पुणे येथील मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात घडलेला दुर्दैवी प्रकार अन्य ठिकाणच्या रुग्णालयांत पण घडत असतील.
सर्व रुग्णालयांना नियमानुसार गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यास भाग पाडावे. हे रुग्णालय जर नियमभंग करत असतील तर अशी रुग्णालये सरकारजमा करून शासकीय रुग्णालयांना जोडून मोफत उपचार सुरु करावेत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा संभाजी आरमारने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, दक्षिण तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष अजिंक्य पाटील, संपर्कप्रमुख राजाभाऊ आखाडे, अमित जोगदंड, प्रदीप मोरे उपस्थित होते.
0 Comments