Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठी भाषा समृद्धीसाठी वाचनसंस्कृती आवश्यक : श्रीकांत मोरे

 मराठी भाषा समृद्धीसाठी वाचनसंस्कृती आवश्यक  : श्रीकांत मोरे

मनोरमा बँकेत मराठी भाषा गौरव दिन, जागतिक महिला दिन साजरा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मराठी भाषेच्या समृद्धीसाठी वाचनसंस्कृती चांगली असायला पाहिजे. तरच मराठी भाषा उत्त्तम प्रकारे तग धरू शकेल. पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याचे घोषित केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, मसाप पश्चिम सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी केले. 

 मसाप पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर, मनोरमा साहित्य मंडळी, अस्मिता व्हीजन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन, जागतिक महिला दिन सोमवारी सायंकाळी मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजशेखर शिंदे उपस्थित होते. व्यासपीठावर मनोरमा मल्टिस्टेटच्या चेअरमन सौ. शोभा मोरे, कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड, डॉ. ऋचा मोरे पाटील, प्रा. राजशेखर शिंदे, पद्माकर कुलकर्णी, अॅड. सुरेश गायकवाड, मसापच्या कोषाध्यक्षा शिल्पा कुलकर्णी, सौ. कविता कुलकर्णी, निमंत्रित कवयित्री आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, मनोरमा परिवार निरपेक्ष परिवार आहे. मराठी आपली बोलीभाषा असून नवनवीन शब्द स्वीकारले पाहिजेत. त्याचा वापर लेखक, कवींनी केला पाहिजे. बोलीमुळे मराठीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळाला आहे. कोकणी भाषेलाही अभिजात दर्जा मिळायला हवा. लेखकांनी स्वतः यासाठी पुढाकार घ्यावा. आता मराठीचा सन्मान दिन शासनाने घोषित केला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे कविसंमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिमच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये प्रा. डॉ. श्रुती वडकबाळकर, वंदना कुलकर्णी, संगीता एखंडे, सुनंदा काळे, विजयलक्ष्मी हंजगी, विनीता घोडके, रेणुका बुधाराम, निर्मला शितोळे, दीपलक्ष्मी कुलकर्णी, प्रा. माउली पवार, पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. यावेळी काव्यसंमेलनाच्या अध्यक्षा अस्मिताताई गायकवाड व शोभाताई मोरे यांच्या हस्ते मान्यवर कवयित्रींचा सत्कार करण्यात आला.

प्रा. लता विलास मोरे, प्रीती नायर, दीपाली पवार, सुवर्णा व्हटकर, निर्मला शितोळे, स्नेहल राठोड, सुरेखा साळवी, शोभा वाले यांचा आदर्श महिला म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी काव्य संमेलनाच्या अध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, मसाप मनोरमा शाखा पश्चिमच्या उपाध्यक्षा  शोभाताई मोरे, प्रा. माउली पवार यांनी विचार व्यक्त केले. डॉ. ऋचा मोरे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. सौ. कविता कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास मोरे, उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे व मसापचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments