दड बाबा दड, हिंदूत्वाच्या पदराआड दड ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 8, 2024

दड बाबा दड, हिंदूत्वाच्या पदराआड दड !

 दड बाबा दड, हिंदूत्वाच्या पदराआड दड !


परवा संसदेत विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा जणू नक्षाच बदलून टाकला. राहूल गांधी बोलत असतानाच प्रधानमंत्र्यांनी, गृहमंत्र्यानी  मध्येच बोलायला सुरूवात केली. राहूल गांधी बोलत असताना नरेंद्र मोदींच्या व अमित शहांच्या चेहऱ्यावर कमालीची अस्वस्थता पसरली होती. मोदी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्याचे पुन्हा पुन्हा छाती बडवून सांगत आहेत. पण तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जेवढा तणाव दिसतो तेवढा इस्त्रायईल-पॅलेस्टाईनच्या युद्धातही दिसत नाही. निवडणूक जिंकूनही हरलेल्या मोदी-शहांना राहूल गांधींनी नागडं-उघड केलं. अखेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हिंदूत्वाचे कार्ड काढावे लागले. राहूल गांधींच्या भाषणाचा विपर्यास करत ते हिंदू धर्मीयांच्यावर टिका करतायत अशी गोबेल्स नितीची थाप मारावी लागली. मोदींना शकूनी मामाच्या चालीने राहूल गांधींना उत्तर द्यावे लागले. अहंकराने टचटचून भरलेल्या नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात "एक अकेला" म्हणत संसदेत कैकवेळा स्वत:च स्वत:ची छाती आणि पाठ बडवून घेतली. दहा वर्षे सलग कमालीच्या थापा मारत देशवासियांची दिशाभूल केली. फसव्या योजना, फसव्या घोषणा आणि धादांत लबाडी करत सरकार चालवले. सरकार चालवत असताना ज्या विकासाच्या वल्गना केल्या त्या फाट्यावर मारल्या. 'सबका साथ सबका विकास' असल्या घोषणांचे कधीच भुसकाट झाले. देश अराजकाच्या उंबरठ्यावर येवून ठेपला. २०१४ साली महागाईचा मुद्दा करत सत्तेत आलेल्या मोदींनी महागाई हा शब्दच परत उच्चारला नाही. तीस रूपये दराने पेट्रोल देतो, काळा पैसा आणतो, दहशतवादाचा बिमोड करतो, नोटबंदीने काळा पैसा बाहेर काढतो, नाही झालं तर चौकात फाशी द्या, दोन कोटी रोजगार देतो, पंधरा पंधरा लाख खात्यावर टाकतो, शेतीचे स्वतंत्र बजेट मांडतो, स्मार्ट सिटी करतो, स्मार्ट व्हीलेज करतो अशा अनेक लोणकडी थापा मारून सत्तेत आलेले मोदी गेली दहा वर्षे केवळ पर्यटन आणि इव्हेंट करत राहिले. मिडीयाला पँकेजची पेडीग्री खायला घालत सगळे टाचेखाली घेतले. २०१४ च्या प्रचारातले मुद्दे प्रचाराच्या बाहेर गेले. मोदींना आपण केलेल्या घोषणांचा विसर पडला. २०१४ साली आपण लोकांना काय काय सांगितले होते ? याची त्यांना आठवणही राहिली नसेल. 


 २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत विकासपुरूष वाटणाऱ्या नरेंद्र मोदींचा चेहरा कालच्या लोकसभा निवडणूकीत भेसूर व भयावह वाटत होता. ते डोक्यावर पडल्यासारखे काहीही बरळत होते. त्यांचा बॅलन्स ढळल्याचे दिसले. परवा संसदेत राहूल गांधींनी अक्षरश: त्यांना नागडे केले. उत्तर द्यायला ठोस काहीच नसल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिंदू समाजाचे नाव घेत अवघ्या देशाची दिशाभूल करत आहेत. अमित शहांनी संसदेला, ये झुट बोलने की जगह नही है ! असं सांगावं याच्यासारखा मोठा विनोद कोणता असू शकतो ? मोदी-शहांनी खोटं बोलण्याबाबत कांगावा करावा म्हणजे लांडग्याने शाकाहारावर प्रवचन देण्यासारखे आहे. राहूल गांधींच्या जोरदार हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नरेंद्र मोदींना हिंदूच्या पदराआड दडावं लागलं. एखादं बारकं बाळ चुक करतं आणि लगेच आईच्या पदराआड दडतं तसा हा प्रकार आहे. पण ते लहान मुल निरागस व निखळ असतं. इथं हे महाशय निरागस आणि निखळ नाहीत. कमालीचे चालबाज, धुर्त, लबाड, पाताळयंत्री व अहंकारी आहेत. "नाक कापलं तरी भोक आहे !" म्हणणारी झॉड प्रवृत्ती असते. हे अवतारी बाबा त्याच माळेतले आहेत. राहूल गांधींनी भाजपवर जो हल्ला चढवला होता तो भाजपवर नव्हे तर संपुर्ण हिंदूच्यावर आहे असा कांगावा करायला सुरूवात केली आहे. पण राहूल गांधींनी तिथेही मोदींना उघडे नागडे करत मोदीजी म्हणजे संपुर्ण हिंदू समाज नाही, भाजप म्हणजे संपुर्ण हिदू समाज नाही, आर. एस. एस. म्हणजे संपुर्ण हिंदू समाज नाही. भाजपाला हिंदू समाजाचा ठेका दिलेला नाही असे ठणकावून सांगितले. खरेतर राहूल गांधींच्या भाषणाने मोदींसह संपुर्ण सत्ताधारी पक्षाला कुठे तोंड दडवावं ? हे सुचत नव्हतं. ते अधून मधून उठत होते, ओरडत होते. स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी मंडळी अधून मधून उठत होती. गेली दहा वर्षे लोकशाही फाट्यावर मारत दडपशाही करणारे सत्ताधारी लोकशाहीची आणि संसदीय नियमांची भाषा बोलत होती. राहूल गांधींनी मोदीना त्यांच्या गेल्या दहा वर्षात केलेल्या राज्य कारभाराचा आरसा दाखवला. पण त्या आरशात मोदीजी स्वत:चा चेहरा पाहू शकत नाहीत. स्वत:चाच चेहरा पाहू वाटत नसेल तर तो किती भयंकर आहे याची जाणीव मोदींना झाली आहे काय ?

     मनिपुरचा प्रश्न असेल, शेतकरी आंदोलनाचा प्रश्न असेल किंवा मुर्खपणाने केलेली नोटबंदी असेल अशा प्रत्येक ठिकाणी मोदींनी काय दिवे लावले ? ते अवघा देश जाणतो. राहूल गांधींनी अशा अनेक मुद्यांवर मोदी-शहांना नागडं-उघडं केलं. नेहमी स्वत:च "एक अकेला मोदी" असं म्हणत अंहकाराने टचटचून भरलेले मोदी स्वत:ची तथाकथित छप्पन इंच छाती बडवत आले. इडी, सीबीआय, फोडलेले विरोधी पक्ष वगैरे मंडळी सोबत घेवून "एक अकेला" म्हणवून घेणाऱ्या मोदींना "एक अकेला राहूल" खुपच भारी पडला. संसदेत मोदींना घाम फुटायचेच बाकी होते. अजून काही काळ राहूल गांधी बरसले असते तर मोदी-शहांनी तिथेच राहूल गांधींच्या गचांडीला पकडले असते. इतके ते अस्वस्थ झाले होते. मोदींच्या चेहऱ्यावरचा कमालीचा ताण दिसून येत होता. मोदींनी नंतर केलेल्या भाषणात त्यांच्या अहंकराचा दर्प अतिशय उग्रपणे जाणवत होता. ज्याला पप्पू म्हणून हिनवले, कोण राहूल ? म्हणून उपहास केला, अनेक केसेस टाकल्या, तुरूगात टाकण्याचा प्रयत्न केला, घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, संसदेतून बाहेर काढला, करोडो रूपये खर्चून, शिव्या देणारी, बदनामी करणारी लाखोंची पिलावळ उभी केली. त्याची वाट लावण्यासाठी जंगजंग पछाडले तोच राहूल गांधी मोदींना भारी पडला. तो पप्पू म्हणून हिनवलेला राहूल गांधी आज या लोकांचा पप्पा झाला. त्याच्या आक्रमणापासून वाचताना मोदींना हिंदूत्वाच्या पदराआड लपावे लागले. शिखंडीच्या आड दडत लढणाऱ्या अर्जूनासारखं मोदींना हिंदू समाजाच्या पदराआड दडावं लागतं आहे. हिच मोदींची मोठी शोकांतिका आहे.

                                                                          दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो.95611006

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages