मर्म शिवराज्याभिषेकाचे
मणिपूरची भयानक समस्या, तिथला हिंसाचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, निवडणूका जिंकण्यासाठी राजकारणाची घसरलेली पातळी, संपलेली नैतिकता, हे सगळं जुनं आहे. तसेच वरच्या परिस्थितीचे वर्णन करायला पद्मा गोळे यांच्या शब्दांचा आधार घ्यायलाच हवा. पालखीतून मिरवत होते ते विकले गेलेले, स्वाभिमान अन क्षात्रतेज तर धुळीत मिळून गेलेले.
शिवरायांच्या वेळी ही अशीच सामाजिक परिस्थिती होती. आपल्या कर्तुत्वाने त्यांनी महाराष्ट्राला महानते प्रत नेले. यानिमित्ताने शिवरायांचा आठवावा राज्याभिषेक! असे एक शिक्षक म्हणून वाटत राहिलं. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महानतेच्या या मानदंडाच्या जाणत्या राजेपणाचेच अनुकरण करायला हवे. यास्तव हा लेख प्रपंच.
जनतेकडून ६ जून ते २० जून या पंधरवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशात उत्साहात साजरा होत आहे. खरंतर आजच्या शासनकर्त्यांनी शिवराज्याभिषेकाचे महत्त्व समजून घेण्याची आवश्यकता आहे. मला नेहमी प्रश्न पडतो असं काय होतं शिवरायांकडे ? का आठवण करतो आपण शिवरायांची ?
१) महाराजांनी स्वराज्यासाठी एक स्वप्न बघितले होते.सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा दुर्दैवाने महाराज अल्पायुषी ठरल्याने अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. महाराजांचे मावळे म्हणून आपणास ते पूर्ण करावयाचे आहे.
२) महाराजांनी सतत ध्येयाचा पाठपुरावा करताना, त्याच्या पूर्ततेसाठी तात्कालीक तडजोडी बिनदिक्कत पणे केल्या. पण ध्येयाचा विसर पडू दिला नाही याउलट महाराजांनंतर आपण त्यांची विचारधारा विसरलो म्हणून पारतंत्र्यात गेलो. दुर्दैवाने असे म्हणावे लागते की जे महाराजांना उमजले ते आम्हाला अजूनही नाही समजले.
३) या देशात आलेले परकीय आक्रमकांचे उद्दिष्ट केवळ सत्ता आणि संपत्ती मिळवणे इतकेच नसून आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणे हा सुद्धा आहे. याची महाराजांना चांगलीच जाण होती. महाराजांच्या मते माझ्या देशात माझीच सत्ता असली पाहिजे. परकीयांना इथे राहायचे असेल तर त्यांनी माझ्याच अटी व शर्तीवर राहिले पाहिजे.
४) रयतेच्या भावनांची कदर - १७५७ मध्ये प्लासीच्या विजयानंतर रॉबर्ट क्लाइव्ह आपल्या सैन्यासह प्लासी गावातून राजवाड्याकडे जात असताना रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक उभे होते. पण एकही नागरिकांने प्रतिकार केला नाही. कारण स्थानिक जनता नवाबाच्या राज्यकारभाराला विटलेली होती. महाराजांचा राज्याभिषेकिनंतर काही अप्रिय घटना घडत होत्या. जनते कडून राज्याभिषेका बाबत शंका व्यक्त केली जात होती तेंव्हा महाराजांनी जनतेच्या समाधानासाठी दुसरा राज्याभिषेक करून घेतला. भगवान श्रीरामांनी सुद्धा जेंव्हा जनतेमधील काही लोकांनी सीतेबद्दल शंका निर्माण केली तेव्हा तिला वनात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात राज्यकर्त्यांना जनतेच्या भावनांचा इच्छा आकांक्षांचा सतत विचार करावा लागतो.
५) शिवराज्याभिषेकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठी संकटे असू द्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्ण करता येतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवराज्याभिषेक होय.
६) राज्याभिषेकाच्या दिवशी सिंहासनाकडे प्रस्थान करताना महाराजांना या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या असंख्य मावळ्यांची आठवण येत होती. ज्या असंख्य वीरांच्या सहकार्याने आणि बलिदानाने हे स्वराज्य उभे राहिले होते त्यांच्या कायम ऋणात राहणे महाराजांनी स्वीकारले. आज याच गोष्टीचा सर्वत्र अभाव दिसून येतो.
७) महाराजांनी मावळ्यांची अंतरिक शक्ती जागवली. त्याचा परिणाम असा झाला 'मरेपर्यंत लढणारे मराठे जिंके पर्यंत लढू लागले'. आज आपण प्रत्येकाने आपल्यातल्या अंतरिक शक्तीला ओळखण्याची व तिला जागवण्याची आवश्यकता आहे.
८) राज्याभिषेकाची महत्त्वाची देण म्हणजे राज्याभिषेक आपल्याला जोखीम घ्यायला शिकवतो. महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अनेक वेळेला जोखीम पत्करली. म्हणूनच राज्याभिषेक होऊ शकला.
९) महाराजांनी जनतेला प्रेरणा आणि उत्तम राज्य व्यवस्थेचा विश्वास दिला. या गोष्टींचा परिणाम रयतेवर इतका खोलवर झालेला होता की महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा घास गिळण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला २७ वर्ष मराठ्यांशी संघर्ष करावा लागला. येथील रयत आणि सैनिक हातात हात घालून प्रत्येक गावातून मोगली सैन्याशी संघर्ष करीत होती. त्यामुळे आलमगिराला यश नाही मिळाले. खरंतर आजचे राज्यकर्ते जनतेमध्ये हा विश्वास आणि प्रेरणा निर्माण करण्यात कमी पडत आहेत हे मात्र निश्चित.
१०) महाराजांनी काळाची पावलं ओळखत प्रत्येक वेळी संघर्ष करताना प्रसंगानुरूप शस्त्रे शोधली व वापरली. उदा. अफजलखान वधासाठी वापरलेली वाघनखं किंवा आरमारी युद्धात इंग्रजांविरुद्ध वापरलेल्या संगमेश्वरी बोटी ही याची उत्तम उदाहरणे आहेत. प्रशासकीय कामातही रयतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक बदल केले. आज आपणही काळाची पाऊले ओळखत महाराजांच्या व आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
११) शिवराज्याभिषेक आपल्याला संकल्पचे महत्त्व सांगतो. महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीचा जो संकल्प सोडला तो इतका मनापासून होता की त्यांच्या संकल्प पूर्तीसाठी निसर्गातील अनेक शक्तींनी महाराजांना वेळोवेळी सहकार्य केल्याचे अनुभव आपल्याला शिवचरित्रात वेळोवेळी मिळतात. आपणही आपल्या ध्येयप्राप्तीसाठी मनापासून संकल्प सोडल्यास किंवा तन्मयतेने मेहनत घेतल्यास आपले ध्येय निश्चित साध्य होऊ शकेल.
१२) महाराजांचा हा राज्याभिषेक आपल्याला हेही शिकवून जातो की मोठ्या स्वप्नपूर्ती साठी तितक्याच प्रचंड साधन संपत्तीची आवश्यकता नसते. सुरुवात ही शून्यापासूनच होते. महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प सोडला तेंव्हा ती त्यांची सुरुवात होती. महाराजांनी गनिमीकाव्याच्या सहाय्याने अल्पसाधने असतांनाही मोठ-मोठे विजय मिळवले, पुढील शंभर वर्षातच त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.
१३) हा राज्याभिषेक आपल्याला माणसे जोडायलाही शिकवतो. महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. हे करत असताना त्यांनी असंख्य माणसे जोडलीत. जोडलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. प्रत्येक माणसाचे मोल महाराज जाणत होते. आपणही आपल्या जीवनात ध्येयाची वाटचाल करताना शक्य तेवढी मानसे जोडावीत. विवेक बुद्धीचा वापर करत कोणालाही शक्यतो दुखवू नये. जोडलेला प्रत्येक माणूस केव्हा कुठे कसा उपयोगी पडेल हे आपल्याला आधी माहीत नसते.
१४) हा राज्याभिषेक आपल्याला आपापसातील भेदभाव मिटवायलाही शिकवतो. बाल शिवबा हे जहागीरदाराचे सुपुत्र होते. तरीही सर्वसामान्यांच्या मुलांसोबत ते खेळत. महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना समाजातील सर्व १८ पगड जाती जमातीच्या लोकांना गुलामगिरी विरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. परिणामी विविध गटांमध्ये, जातीपातींमध्ये विभागलेला समाज एकत्र आला म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.
१५) शिवराज्याभिषेक आपल्याला सतत जागृत आणि जागे रहायला शिकवतो. या जागृत पणामुळेच महाराजांनी स्वराज्यावरील आलेली अनेक संकट लिलया पार करत राज्याभिषेक घडवून आणला. शिवचरित्राचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असे स्पष्टपणे दिसून येते की महाराजांविरुद्ध दोन किंवा दोनपेक्षा जास्त शत्रु एकत्र आलेत असे कधीही झाले नाही. अनेक इस्लामी सत्तांशी संघर्ष असताना सुद्धा त्यांनी महाराजांविरुद्ध आपल्याला दिसत नाही. याचे कारण महाराजांची सतत जागृत आणि सावध राहण्याची भूमिका. पण इतिहासामध्ये आणि आज सुद्धा अनेक वेळेला आपला पराभव हा जागृतपणाच्या अभावामुळेच झालेला दिसून येतो.
१६) महाराजांनी अनेक दैदिप्यमान विजय मिळवले पण कधीही त्या विजयानंतर त्याचा उत्सव साजरा केला नाही किंवा उत्सव होऊ दिला नाही. म्हणूनच ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. आपणही विजयाने हुरळून जाता कामा नये. सतत पाय जमिनीवर राहिले पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा सुरुवातीच्या विजयानंतर शेवट मात्र पराभवाने होतो हे इतिहासात अनेक वेळेला दिसून आले आहे.
१७) हा राज्याभिषेक आपल्याला जीवनात आलेली संधी ओळखायला शिकवतो आणि त्या संधीचं सोन करायलाही शिकवतो. आपल्याला कोणी संधी-साधू म्हटलं तरी वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण संधी ही साधलीच पाहिजे हे महाराज आपल्याला सांगतात. महाराजांनी अनेक मोहिमा तडीस नेतांना मिळालेली प्रत्येक संधी साधलीच, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शत्रूला कधीही संधी दिली नाही.
एक शिक्षक या नात्याने मला सतत वाटते की या देशातील सर्व समस्यांची उत्तरे महाराजांच्या कार्यकर्तृत्वात व विचारधारेत आहेत. तेव्हा हा शिव विचार रुजवणे, वाढवणे यासाठी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत तो विचार विविध पद्धतीने येणाऱ्या पिढी पर्यंत पोचवणे आज काळाची गरज आहे. यासोबतच आपण सर्व महाराजांचे मावळे या दृष्टीने विचार करत आपण काम करत असलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे यामुळेच हा देश आत्मनिर्भर होऊन विश्वात विश्वगुरू म्हणून नाव करेल यात शंका नाही.
लेखक
प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे
के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.
.jpg)
No comments:
Post a Comment