जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ४१६ व्या जयंतीनिमित्त हार्दिक सदिच्छा !! (जन्म २ फेब्रुवारी १६०८ ) - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 2, 2024

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ४१६ व्या जयंतीनिमित्त हार्दिक सदिच्छा !! (जन्म २ फेब्रुवारी १६०८ )

 जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या  ४१६ व्या जयंतीनिमित्त हार्दिक सदिच्छा !! (जन्म २ फेब्रुवारी १६०८ )


मायबाप केवळ काशी ! तेणे न वजावे तीर्थासी !!

पुंडलिके काय केले ? ! परब्रम्ह उभे ठेले !!

तैसा होई सावधान ! हृदयी धरी नारायण !!

तुका म्हणे मायबापे ! अवघी देवाची स्वरूपे !!

आई वडील हे देवाचे रूप आहे त्यांची सेवा , त्यांचा सहवास म्हणजेच काशी आहे. देवावर श्रद्धा असावी देव हृदयात असावा पण आई-वडिलांची सेवा सोडून देवाकडे जाण्याची गरज नाही  जसं पुंडलिकाने आई-वडिलांची सेवा करताना पांडुरंगाला थांबवून ठेवलं तसं मनोभावे आई-वडिलांची सेवा केल्याने ईश्वर प्राप्ती होते हे सत्य संत तुकोबाराय आपल्या अभंगात सांगतात. मानवी जीवन जगताना वास्तवाचे भान ठेवावं याचा अनेक अभंगातून संत तुकोबाराय उल्लेख करतात. 

जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले ! 

तोचि साधू ओळखावा ! देव तेथेच जाणावा !!

याही अभंगात तुकोबाराय सांगतात समाजामधील रंजल्या गांजल्या लोकांना मदत करावी त्यातच ईश्वराची सेवा आहे. 16 व्या शतकात एकीकडे गनिमांच राज्य तर एकीकडे धर्म मार्तंडांचे वर्चस्व अशा काळात संत तुकोबाराय आपल्या किर्तनातून समाज प्रबोधनाचे काम करत होते. समाजामध्ये असणाऱ्या वेदना समजून घेऊन त्यावर मात करण्याची शक्ती त्यांच्या अभंगातून देत होते. प्रत्येकाने संकटाच्या विरोधात ताकतीने लढा द्यावा व कोणताही अन्याय सहन करू नये अशा पद्धतीने आपल्या प्रगल्भ अभंगामधून तुकोबाराय लोकांचा आत्मविश्वास बळावत होते.

मऊ मेणा आम्ही विष्णुदास ! कठीण वज्रास भेदू ऐसे !

भले तर देऊ कासेची लंगोटी !नाठाळाचे माथी हाणू काठी !!

अशा पद्धतीने नाठाळाच्या विरोधात लढण्याची शक्ती संत तुकोबाराय आपल्या वाणीतून देत होते.  त्या काळात लिहिण्याचा किर्तन करण्याचा अधिकार बहुजनांना नव्हता म्हणून तात्कालीन धर्म मार्तंडानी संत तुकोबारायांना अतोनात त्रास दिला. त्यांची गाथा नदीमध्ये बुडवली परंतु संत तुकोबारायाचे शिष्य संताजी जगनाडे यांनी तुकोबारायांचे अभंग लिहून ठेवले होते म्हणून आज आम्हाला ते उपलब्ध झाले. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल अशी विचारांची नांगरणी तुकोबारायांनी केली होती. अन्यायाविरुद्ध लढण्याची उमेद निर्माण केली होती म्हणूनच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवराय तुकोबारायांच्या समक्ष भेटीसाठी गेले होते. अनेकदा त्यांच्या किर्तनालाही त्यांनी हजेरी लावली.  शिवरायांचा स्वराज्याचा मनसुबा त्यांच्यामध्ये असणारी प्रबळ इच्छाशक्ती आणि कमालीची उमेद पाहून संत तुकोबारायांनी शिवरायांना आशीर्वाद दिले शिव तुझे नाव ठेविले पवित्र ! छत्रपती सूत्र विश्वाचे की !!  आणि तात्कालीन परिस्थितीचे अन्यायाची धार्मिक गुलामगिरीची जाणीव शिवरायांना करून दिली म्हणून छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणून संत तुकोबारायांचा उल्लेख होतो. आज संत तुकोबारायांची ४१६ वी जयंती साजरी करत असताना त्यांच्या अभंगवाणीचा विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे आज विज्ञान तंत्रज्ञान घराघरापर्यंत पोहोचलं आहे पण माणसातला माणूस हरवत चालला आहे यंत्राप्रमाणे तोही कदाचित भावना संवेदना विसरेल की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे म्हणून आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये संत तुकाराम महाराजांची विचारधारा रुजविण्याची अत्यंत गरजेचे आहे. जगभरामध्ये तुकोबारायांच्या गाथेचं अभंगांचे कौतुक होत असताना आम्ही ही ते अभंग आत्मसात करणे गरजेचे आहे. मोबाईल संगणकाच्या युगामध्ये पुन्हा एकदा वाचन संस्कृती बळकट करणे आणि घराघरांमध्ये तुकाराम गाथा सारखे ग्रंथ जोपासणे ही आजच्या काळातील तातडीची गरज आहे ती आम्ही सर्वांनी पूर्ण करणे हेच आजच्या जयंती दिनी तुकाराम महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन ठरेल. पुन्हा एकदा जगद्गुरु संत तुकोबारायांच्या जयंती निमित्त मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा !!

...... प्रशांत पाटील

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages