कारमधून वाहतूक होणारी देशी दारू जप्त
पंढरपूर विभागाची कारवाई
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे एका कारमधून वाहतूक होणारा तेहतीस हजार सहाशे किंमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पंढरपूर- पुणे हायवे रोडवरील पिराची कुरोली या ठिकाणी पाळत ठेवली असता नितीन रेवस पवार, वय 36 वर्षे, राहणार वडार गल्ली, भाळवणी ता. पंढरपूर हा मारुती झेन MH 14 M 912 या वाहनातून देशी दारूचा साठा अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असलेला आढळून आला. वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 480 बाटल्या ज्याची किंमत 33 हजार सहाशे रुपये इतकी आहे जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण एक लाख तेहतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली.
आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू, देशी विदेशी दारू, परराज्यातील दारूविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या परिसरात अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास या विभागाला त्याची माहिती द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

No comments:
Post a Comment