Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील धाब्यावरही छापा हॉटेल चालकासह दोन मद्यपी अटकेत, 27 हजारांचा दंड हातभट्टी वाहतूक करणारी कारही पकडली

 मोहोळ तालुक्यातील धाब्यावरही छापा

हॉटेल चालकासह दोन मद्यपी अटकेत, 27 हजारांचा दंड

हातभट्टी वाहतूक करणारी कारही पकडली

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका धाब्यावर धाड टाकून कारवाई केली. तसेच सोलापूर  पथकानेही कोंडी येथे हातभट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केला.

सविस्तर वृत्त असे की, नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने  कातेवाडी (ता. मोहोळ) येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता धाबाचालक तानाजी श्रीपती वाघमोडे, रा. कुरुल (ता. मोहोळ) हा ग्राहक शिवाजी लहू ओहळ व भिनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना होटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले. तपास अधिकारी यांनी तिन्ही आरोपींना  ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रमांक २, मोहोळ श्री पी जी महाळनकर यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक याचेकडून पंचवीस हजार रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे पुलाच्या खाली सर्विस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड, वय 20 वर्षे, राहणार मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर)  हा त्याच्या निळ्या रंगाचे हुंडाई कंपनीची कार क्र. MH 12 FB 9638 मध्ये रबरी ट्यूबमधून अंदाजे तीनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण दोन लाख पंधरा हजार तीनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ब 1  विभाग रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली. एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशिनाथ देसू राठोड,  वय 50 वर्षे, राहणार मुळेगाव तांडा हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक MH13 DC 7742 वरून दोन रबरी ट्यूबमध्ये अंदाजे 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या ताब्यातून साठ हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने केली.  

आवाहन

नवीन वर्ष व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा विशेष पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारूच्या तस्करीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच हॉटेल धाब्यांचीही अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे. हॉटेल धाब्यांवर दारू विक्री करणे व तिथे बसून दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे. ज्या हॉटेल्सना नवीन वर्षाची पार्टी आयोजित करायची असेल, त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्यावा अन्यथा  हॉटेल मालक व आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments