लऊळ येथे रास्ता रोको, दिवसभरासाठी गाव कडकडीत बंद
लऊळ (कटूसत्य वृत्त):- येथे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज याची न्यायालयीन चौकशी व्हावी व मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी कुर्डुवाडी पंढरपूर मार्गावर लऊळ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आली.यावेळी समृध्दी लोकरे,गायत्री मोरे या शाळकरी मुलींनी आपले मनोगत व्यक्त करताना आंदोलकांना झालेल्या अमानुष लाठचार्ज याचा निषेध व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणीही केली.सदर मागणीचे निवेदन मंडल अधिकारी सुजित शेळवने यांनी स्वीकारले.झालेल्या आंदोलनात सर्व जातीधर्माच्या लोकांनी सहभाग नोंदवत गाव पूर्णपणे कडकडीत बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दिला.याप्रसंगी एक मराठा लाख मराठा व महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.रास्ता रोकोच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यांतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी व्याख्याते हर्षल बागल,प्रताप नलवडे,सरपंच लक्ष्मण भोंग,सचिन गवळी,बापू लोकरे,विष्णू नलवडे,अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश नलवडे,ग्रामपंचायत सदस्य महेश बागल,सतीश मांदे,संतोष भोंग,पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे,धनंजय नलवडे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
शाळेच्या वाहनांना केली वाट मोकळी....
आंदोलन सुरू असताना कुर्डूवाडीच्या दिशेने विद्यार्थ्याना घेऊन निघालेल्या शाळेच्या वाहनांना आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली.

No comments:
Post a Comment