हातमाग कापडाला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत- आ विजयकुमार देशमुख
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- यांत्रिक युगात विविध स्पर्धेचा सामना करत विणकारांकडून त्यांचे पिढीजात, पारंपारिक हातमागावर समृद्धीचे वस्त्र विणण्याची आणि वस्त्र संस्कृतीचा अमूल्य ठेवा जोपासण्याचे काम अविरतपणे केले जात आहे. हातमाग वस्त्रोद्योग मध्ये काम करणाऱ्या संस्थांनी हातमाग कापडाला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग आयुक्त वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांचे हातमाग कापड प्रसार प्रसिद्धी व विक्री विकास कार्यक्रमांतर्गत स्पेशल हॅन्डलूम एक्सपो सोलापूर या नावे हातमाग कापडाचे प्रदर्शन विक्रीचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूरद्वारे दिनांक 2 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत मोरारजी पेठ, सोलापूर येथील ड्रीम पॅलेस बॅक्वेट हॉल, पोलीस कल्याण केंद्राजवळ, सरस्वती चौक, सोलापूर या ठिकाणी केलेले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार श्री. देशमुख मार्गदर्शन करत होते. यावेळी महाटेक्स मुंबईचे माजी अध्यक्ष गणपत कुरपाटी, माजी उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण गुल्लापल्ली, प्रादेशिक सह उपायुक्त किसनराव पवार, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय निमजे उपस्थित होते.
आमदार श्री. देशमुख पुढे म्हणाले की, हातमाग वस्त्र उद्योग मध्ये विणकर हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जे अविरतपणे प्रयत्न करत आहेत, त्या व्यवसायात त्यांच्या प्रयत्नांना सर्वांनी मिळून प्रोत्साहन दिले पाहिजे व हातमाग कापड्याला चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे. आजच्या डिजिटल मंचावरही हातमाग कापड्याला जागतिक व्यासपीठ व ओळख मिळाली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कारण या कलेवरच येथील कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संबंधित संस्थांनी हातमाग व्यवसायाचे बळकटीकरण करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सोलापूर शहरात दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत हातमाग कापड्याचे जे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे, त्या प्रदर्शनात राज्यभरातील जवळपास 40 विणकारांनी आपले स्टॉल लावलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन येथील हातमाग कापड खरेदी करण्याचे आवाहन ही आमदार देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय निमजे यांनी केले. वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन नागपूरच्या वतीने प्रचार प्रसिद्धी योजनेंतर्गत वस्त्र नगरी अशी ख्याती असलेल्या सोलापूर शहरात प्रथमच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रदर्शनात राज्यातील हॅन्डलुम मार्क प्राप्त 40 हातमाग सहकारी संस्था व महा हॅण्डलूम नागपूर संस्थांनी सहभाग घेतलेला आहे. प्रदर्शनात हातमागावरील उत्पादित अस्सल वस्त्रे तसेच सिल्क टसर साडी व पैठणी सिल्क साडी, कोशा सिल्क साडी व कापड, घरगुती वापरण्याचे चादरी, टॉवेल, बेडशीट, नॅपकिन, पंचे, लहान व मोठ्या सतरंज्या विक्रीस ठेवलेले आहेत. सर्व प्रकारचे कापड खरेदीवर २० टक्के सवलत सहभागी संस्थाकडून देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आजपासून दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुरारजी पेठ, सोलापूर येथील ड्रीम पॅलेस बॅक्वेट हॉल पोलीस कल्याण केंद्राजवळ, सरस्वती चौक या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनास भेट देऊन हातमाग कापड खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
.png)
No comments:
Post a Comment