योजना पोचतात का.. घरोघरी..? अन् म्हणे...! शासन आपल्या दारी..!!.png)
सोलापूर (दादासाहेब निळ):- सध्या राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रात सापडला आहे. कारण यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सोलापूर सह संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. असं असताना दुष्काळाचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेच्या पैशाचा कोट्यावधी रुपयाचा चुरा करत आहे. जालना जिल्ह्यातील अतिशय अमानुष घटना घडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शासनाने घेतला. आता हाच कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी होणार असून यासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे जिल्हा नियोजन समितीकडून सांगण्यात आला आहे. या उपक्रमातून शासकीय तिजोरीला चुना लागत आहे योजना मात्र जागेवरच राहत आहे हे वास्तव सरकारला दिसत नाही का..? असा प्रश्न सध्या नागरिकांमधून विचारला जात आहे. ज्या योजना या अगोदरही नागरिकांना मिळत होत्या त्यासाठी एवढा खर्च करण्याची गरज नसताना सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला वेड्यात काढण्यासाठीच अशा प्रकारचा उपद्व्याप करत असल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांना विविध योजना त्यांच्या दारात मिळाव्या यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी सुद्धा या कार्यक्रमातून किती जणांना लाभ झाला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. सरकारी कार्यालय आणि त्या ठिकाणचे गले लठ्ठ पगार घेणारे अधिकारी यांच्यावर सरकारचा विश्वास नसल्यामुळेच सरकारला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घ्यावा लागत आहे की काय असाही प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब याप्रमाणे नागरिकांची कामे लवकर व्हावी हा सरकारचा हेतू असला तरीसुद्धा निरडावलेल्या अधिकारी नागरिकांच्या कामापेक्षा स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठीच जास्त लक्ष देत असल्याचे आजवर दिसून आलेले आहे.
या अधिकाऱ्यांना शिस्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार ..?
सरकारच्या योजना सरकारी अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्या योजना अशा प्रकारच्या कार्यक्रम न घेता सुद्धा मिळू शकतात. परंतु अधिकाऱ्यांची मानसिकता पिवळा चष्मा लावल्याप्रमाणे असल्यामुळे याचा काही उपयोग होणार नाही. उलट शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून जनतेच्याच पैशाचा पाण्यासारखा खर्च करून सरकार सर्वसामान्य जनतेची मतं मिळवण्यासाठी केवील वाणा प्रयत्न करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. "आंधळा दळतं आणि कुत्रं पीठ खातं" या म्हणीप्रमाणे सध्या सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जनतेच्या मस्तकी मारला जात आहे. विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी या कार्यक्रमातून मिळणार आहेत हे काम तर सरकारी अधिकाऱ्यांना सातत्याने करावाच लागतो त्यासाठी अशा योजना आणून लाखो रुपयांचा चुरा करण्याची आवश्यकता नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरी मध्ये 10 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि दुष्काळात सुद्धा जिल्ह्याकडे पाठ फिरवलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधारणपणे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपली सगळी मेहनत या ठिकाणी खर्च घातलेली दिसत आहे. सध्या राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना, बेकारी महागाई आणि बेरोजगारीचे तांडव पसरले असताना हे महत्त्वाचे प्रश्न सोडून सरकार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन जनतेच्या डोळ्यात दिवसाढवळ्या माती टाकत असल्याचही नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही एकाच माळेचे मणी असून यांना स्वतःच्या खुर्चीसाठी भांडण्यासाठी भरपूर वेळ आहे परंतु सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न सध्या आ वाचून उभे आहेत. त्याकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. फक्त एकमेकांवर चिखल फेक करण्यात यांचा सगळा वेळ जात असल्यामुळे राज्यामध्ये विकासाचा सूर्य कधी उगवणार..? असा प्रश्न सध्या नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment