आमदारांच्या घरावर 'मतदान बहिष्कार मोर्चा काढणार - योगेश केदार
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे. या मागणीसाठी 6 मे रोजी तुळजापूर येथून तब्बल 500 किलोमीटर भर उन्हात 42 डिग्री तापमान असताना मराठा वनवास यात्रा सुरु केली. त्यानंतर 6 जून रोजी ती मुंबईला पोहचली. त्यानंतर मुंबई येथील आझाद मैदान येथे भर पावसात, चिखलात तीन महिने उपोषण केले.यावेळी उपोषणकर्त्या बांधवावर खोटे गुन्हे देखील दाखल केले. अनेक बिनबुडाचे आरोप केले. परंतु न्यायालयाने मात्र हे आरोप फेटाळून निर्दोष मुक्त केले. तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आली नाही. आता पुढे काय? इथून पुढे सर्व जातीपातीच्या सर्वपक्षीय आमदारांच्या घरावर 'मतदान बहिष्कार मोर्चा'!काढायचा असे मत मराठा वनवास यात्रेचे आयोजक योगेश केदार यांनी व्यक्त केले. 21ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता मराठा वनवास यात्रेच्या अनुषंगाने अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी केदार बोलत होते.
पुढे बोलताना योगेश केदार म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने जागृत मतदार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आजपर्यंत सर्वपक्षीय राजकारण्यांनी मराठा समाजाला गृहीत धरले असल्याचे दिसून येते. मराठा गटतट बघतो, सर्वच राजकीय पक्षात तो विखुरला गेला आहे. त्यामुळे संख्येने सर्वात मोठा असला तरी मराठा समाजाचे राजकीय दृष्ट्या उपद्रवमूल्य नगण्य मानले जाते. म्हणून तर कोणताही राजकारणी किंवा राजकीय पक्ष मराठ्यांच्या ओबीसी आरक्षण मागणी बाबत गंभीर दिसत नाही. आपल्या मागणी बाबत मोजकेच आमदार आता हळू हळू बोलू लागले आहेत. आपल्याला हा वेग वाढवावा लागेल. तो वाढवायचा असेल तर निवडणुकीत बहिष्कार टाकावा लागेल. 17 टक्के लिंगायत समाजाने कर्नाटक मध्ये भाजप चे सरकार घालवले मग आपण तर 32 टक्के पेक्षा जास्त आहोत. आपण महाराष्ट्रातले सगळे पक्ष दाण्याला लावू शकतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे अभी नहीं तो कभी नहीं या न्यायाने कामाला लागू जेंव्हा सगळ्या आमदारांच्या घरावर मराठे निवडणुकीच्या अनुषंगाने मतांचा बहिष्कार टाकतील तेंव्हा सगळ्या पक्षांना गुडघ्यावर यावे लागेल. आपण तसे नियोजन करू असे म्हणाले. तर पहिली बहिष्कार सभा उमरगा येथे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या घरावर होईल. त्यांनतर आणखी पाच मतदार संघ निश्चित झाले आहेत. स्थानिक बांधव यांचे बरोबर चर्चा करून सर्वांना सोबत घेऊन पुढचे कार्यक्रम होतील असेही केदार म्हणाले.
यावेळी बैठकीसाठी विनोद थिटे,महादेव काळे, नवनाथ भाकरे, उमेश भाकरे, अभिजीत बाबर, पत्रकार गणेश जाधव, अजिंक्य सावंत, अमोल पिंपळे, अमर जाधव, पवनराजे घोगरे पाटील, रणजित चव्हाण, सचिन चव्हाण,व इतर बांधव उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment