पुरुषोत्तम खेडेकर जनसंवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

पुरुषोत्तम खेडेकर जनसंवाद

पुरुषोत्तम खेडेकर जनसंवाद 


जय जिजाऊ मित्रांनो , बंधू भगिनींनो , मराठा सेवा संघ व ३३ कक्षातील सहकारी तसेच सर्वच आजी माजी कार्यकर्ते पदाधिकारी व नेते मंडळी .. 

मी व प्रा अर्जून तनपुरे सर बऱ्याच काळानंतर दिनांक ११ ते २२ ऑगस्ट २०२३ दरम्यान मराठवाडा व खानदेश विभागात मराठा जनसंवाद दौरा आटोपून परतलो आहोत . आपण सर्वांनीच दिलेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी होता . यामुळे आमचाही उत्साह अधिक वाढला आहे . सर्वांचेच खूप खूप अभिनंदन व पुढील काळात सदिच्छा . तसेच मनःपूर्वक आभार . 

या दरम्यान आलेले काही निवडक अनुभव कळवत आहे . कृपया गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा ही विनंती आहे . तसेच प्रत्येक ठिकाणी दिसलेले निरिक्षणे सविस्तर नंतर कळवले जाईल .

 जनरल निरिक्षणे ...

(१) सगळीकडेच समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये मराठा सेवा संघ व ३३ कक्ष याबद्दल अतिशय अभिमानास्पद उत्साह आढळला . परंतू दुर्दैवाने आपण लोकांपर्यंत पोचण्यात कमी पडतो . याशिवाय बहुतांशी ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नवीन पिढीतील युवक युवती यांना समाविष्ट करण्यात न आल्याने विचारात व कामातही ढिसाळपणा आला आहे . तरी कृपया लवकरात लवकर नवीन कार्यकारिणी निवडण्यात यावेत अशी विनंती आहे . 

तसेच जून्या सहकाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे बाजूला न होता अगदी आपल्या कुटुंबातील सदस्य व युवकांना पदाधिकारी करून त्यांच्या पाठीशी उभे राहून मार्गदर्शन करावे . मानपान अहंकार आणि गटबाजीचे कारस्थान काही ठिकाणी आढळले . ते समन्वय साधून दूर करण्यासाठी त्यांनी आपले वजन वापरावे असे मत आहे . 

(२) केडर कैंप बंद झाले आहेत . तर जगातील नवनवीन बदल सुरू आहेत . आपण अशा बदलापासून दूर आहोत . परिणामी अगदी अनेक कुटुंबातील जनरेशन गॅप स्पष्टपणे दिसून येत आहे . व्यक्ती पासून कुटूंब व कुटुंबापासून समाज निर्माण होत असतो . याचाच अर्थ असा होतो की आम्ही प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक कुटुंब सर्वार्थाने सशक्त व अत्याधुनिक असणे आवश्यक आहे . या दृष्टीने विचार केला तर आजही कुणबी मराठा समाजातील अनेक युवक युवती नवप्रवाहाचे साथीदार झाले नाहीत . परिणामी एकेकाळी अगदी गावकुसाबाहेर असणारे समाज आज स्पेस युगात पोचले आहेत. तर आम्ही स्टोन युगातच चाचपडत आहोत . पालक व बालक संवाद संपर्क तुटल्याने असे होत आहे . यासाठी नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचे चर्चासत्रे , व्याख्याने व केडर कैंप आयोजित करण्यात आले जावेत . 

(३) मराठा सेवा संघ व ३३ कक्ष स्थापन करण्यात यावेत . तसेच पदाधिकारी संघटक असावेत . मराठा सेवा संघाचे काम समन्वय साधून सशक्त समाज निर्माण करणे आहे. सर्वच ठिकाणी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी असणे दिसणे आवश्यक नाही. इतरांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे .

(४) सगळीकडेच नियमितपणे निधी संकलन करून योग्य प्रकारे खर्च केला पाहिजे . सरप्लस अर्थबळ असावे . आरोप प्रत्यारोप नसावेत .

(५) प्रत्येक पदाधिकारी वयाने पन्नासीच्या आतील असावा . वक्ता मार्गदर्शक व उत्साही असावा . सर्वांनाच सोबत घेऊन काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी व नेते सक्रिय सहभाग घेऊन अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोचले पाहिजे अशी अपेक्षा आहे . यासाठी वेळ विचार व कृती असावी . कृपया प्रत्येकाने आपापल्या बाबत आत्मचिंतन करावे व आवश्यक सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा .

( ६ ) अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते , अधिकारी कर्मचारी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपापले काम करुन घेतात . परंतू दुर्दैवाने मराठा सेवा संघाचे काम करण्याचे सोंग करतात किंवा टाळतात. याशिवाय मराठा सेवा संघाच्या बाबतीत गैरसमज पसरवतात . अशा सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की कृपया असे कोणीही करू नये .

(७) कार्यकर्ते पदाधिकारी व नेते नियमितपणे फिरणारे असावेत . तसेच गाव वार्ड तालुका प्रभाग नगर जिल्हा विभाग राज्य पातळीवर दर आठवड्याला बैठक व्हायला हवी . अशा बैठकीत गाव पातळीवरील विविध क्षेत्रातील विषय ते अगदी जागतिक ते स्पेस बाबतीत चर्चा केली पाहिजे . २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चंद्रावर उतरले आहे . याबाबत टिव्हीवर लाईव्ह माहिती पाहिली असेल . परंतू या निमित्ताने खगोल शास्त्रज्ञ बोलावून अधिक माहिती घेतली पाहिजे. आदित्य एल वन सूर्याभोवती फिरणार आहे . ती माहिती घेतली पाहिजे . यामुळे अंधश्रद्धा अंधविश्वास आणि तत्सम कर्मकांडे दूर होण्यासाठी मदत होईल . या दौऱ्यात अनेक ठिकाणी श्रावण अधिक महिना व त्या अनुषंगाने काही अवैज्ञानिक प्रकार सुरू दिसले . चर्चा केली असता अनेकांना अमावास्या पौर्णिमा ग्रहण  अधिक महिना चांद्रवर्ष सौरवर्ष लिप इअर यातील परस्पर संबंध माहित नाहीत. कुटुंबातील पुरुष मंडळी अशा अंधश्रद्धांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून त्याचे खापर महिलांवर फोडतात . तर अनेक महिलांना समजत असूनही या निमित्ताने त्यांना राजरोसपणे बाहेर पडता येते याचा फायदा घेऊन फिरुन येतात . याचाच अर्थ असा होतो की आजही बहुतांशी उच्च शिक्षित व शहरी नवश्रीमंत कुटुंबातील उच्च शिक्षित महिलांना देखील स्वातंत्र्य दिले जात नाही . त्या सोन्याच्या पिंजऱ्यातील मैना झाल्या आहेत . यातून मुलेमुली सुध्दा अंधश्रद्धा व कालबाह्य रुढी परंपरा यांच्या आहारी गेले आहेत . मोठमोठे वैज्ञानिक देखील सहज सत्यनारायणाची महापूजा करुन समुद्रात बुडालेले जहाज व त्यावर असलेले मेलेली माणसे भटजीच्या मंत्रांनी जिवंत होऊन वर येतात यावर विश्वास ठेवतात . कुटुंबातील वा गावातील समाजातील गोरगरीब गरजवंताला थोडीशी मदत करताना दूर राहणारे अनेक कुणबी मराठा समाजातील व्यक्ती अनावश्यक खर्च करून समाजाला लाजिरवाणे वाटेल असे लग्नसमारंभ व मरणाचे सोहळे करताना दिसतात . भटजींना हजारो रुपयांची दक्षिणा देतात . श्रावण अधिक महिन्यात लाखो रुपये उधळतात . याचे कारण आम्ही समाज म्हणून आजही ऊभे राहिलो नाहीत . पुण्य मिळते या अंधश्रध्देच्या आहारी गेलो आहोत . संत गाडगेबाबा म्हणत , आमचा बहुजन भैताड समाज बीबीसी पापाला पुण्य समजतो . 

मित्रांनो , यात केवळ अंधश्रध्दा हा एकमेव विषय नाही . तर यात मोठी आर्थिक उलाढाल होते . मला आपणच माहिती दिली आहे की कुणबी मराठा बहुजन समाजातील लोक दरवर्षी जे कालबाह्य धार्मिक वा अन्य टाळण्यासारखे विधी करुन भटांना दान दक्षिणा देतात त्यासाठी सरासरी प्रत्येकी कमीतकमी दहा हजार रुपये खर्च येतो . गोरगरीब जनता कर्ज काढून हे करतात . आपली लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे . यापैकी आठ कोटी लोक यात गुंतलेले आहेत असे गृहीत धरले तर दरवर्षी आम्ही कमीत कमी ऐंशी हजार कोटी रुपये केवळ अंधश्रध्दा पोटी खर्च करतो . आम्ही या पैशातून दरवर्षी अंबानी अदानी टाटा यांच्या कडे असलेल्या संपत्ती पेक्षा जास्त पैसे वाया घालवत असतो . आणि मुलेमुली व कुटुंबातील सदस्यांना मातीत घालतो ..

समाज बांधवांनी या सर्व गोष्टी गंभीरपणे समजून घेणे महत्त्वाचे व गरजेचे आहे . कृपया गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा .

(९) मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही गेल्या तीस वर्षांत कुणबी मराठा समाजातील युवकांनी बुट पॉलिश ते डोके मालिश यापैकी आवडीनुसार कोणत्याही व्यवसायात जावे . नोकरी मागण्याऐवजी नोकरी निर्माण करण्यासाठी धडपड करावी . लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नये . तरी कुटुंबातील पालक मुलांच्या मनावर नोकरी मिळाली पाहिजे एवढेच एक बिंबवताना दिसतात . या कारणाने मुलेमुली बेरोजगार फिरत असतात किंवा अतिशय हलके काम नोकरी म्हणून करतात . गेल्या काही वर्षांत शेणाच्या गोवऱ्या व गायीचे शेण मूत्र ॲमाझोनवर ऑनलाईन विकले जात आहे . आम्ही हेच सांगत होतो तेंव्हा समाजातील शहाणे आम्हाला हासत होते . आता शेण मल मूत्र जमा करण्याची नोकरी आमचीच मुलेमुली करतात व एखाद्या शेठजीला सप्लाय करतात . युवकांनो युवतींनो अजूनही वेळ गेलेली नाही . जरा व्यावहारिक पणे व गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा ही विनंती आहे .

(१०) कुणबी मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना व शेतकरी शेतमजूर युवकांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत अशी तक्रार ऐकण्यात आली . हे अर्धसत्य आहे . तसेच याची चाहूल १९९० मध्येच लागली होती . जागतिकीकरणाच्या रेट्यात नोकरी मिळणार नाही असे मराठा सेवा संघ तीस वर्षांपासून सांगत आहे . तसेच तरुणांनी स्वकौशल्यावर व स्वबळावर वाटेल तो उद्दोग व्यवसाय व्यापार करुन उभे रहावे . खर्रा पान तंबाखू गुटखा खाणे , दारु पिऊन रस्त्यावर फिरणे , दादागिरी मोकाटगिरी करणे , बेरोजगारांची फौज निर्माण करणे बंद करावे . कोणत्याही प्रकारची कामे करुन सन्मानाने जगता येईल असे ठरवा . अन्यथा पुढील काळात कोणतीही गरीब श्रीमंत सुंदर मध्यम शिक्षित अशिक्षित मुलगी तुमच्याशी लग्न करणार नाही !!.. हा इशारा दिला होता . उच्च शिक्षित व सुंदर शहरी अनेक मुली खेड्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी श्रमकरी कामगार वर्गातील मुलांशी लग्न करायला तयार आहेत . पण त्यांना दुर्व्यसनी बेरोजगार ऐतखाऊ नवरा नको . तो कितीही श्रीमंत बापाचा असला असला तरी कष्टाळू स्वाभिमानी शेतकरी पाहिजे . घरात चांगले बाथरूम संडास पाहिजे . कमी शिकलेल्या शेतकरी मुलासोबत लग्न करून आज बॅंकेत काही कोटी रुपये बचत व औरंगाबाद येथे एक प्रशस्त बंगला असलेल्या जाधव जोडप्याची व आमची ओळख ऐनवेळी ठरलेल्या कन्नड येथील दौऱ्यात झाली . तेव्हा मुलांनो खूप शिका पण स्वावलंबी बना . 

(११) संभाजी ब्रिगेड व शिवसेना पक्ष यांची राजकीय युती झाली आहे . तरी राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या युवक युवती यांनी पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था , विधानसभा , लोकसभा तसेच अन्य सहकारी संस्था इत्यादी साठी तयारीला लागावे . संभाजी ब्रिगेड व शिवसेना नेते व कार्यकर्ते सदस्य एकत्रित येऊन आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे . शेवटच्या मतदारांपर्यंत पोचून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे . खिशात पैसा नसला व तोंडात साखर व मोहित करणारी भाषा असली तर मतदार मते ही देतात व पैसा ही देतात . घर बसल्या निवडून येणे शक्य नाही . तेंव्हा कृपया कामाला सुरुवात करा . नेहमीच वरील आदेशाची व मदतीची वाट पाहत बसू नये .

 नम्र विनंती ...

(१) कृपया मोडेन पण वाकणार नाही हा अहंभाव सोडून द्या . तसेच यशासाठी दररोज गरज भासल्यास दहा वीस वेळा वाकेल पण कधीच मोडणार नाही याची शपथ घेणे .

(२) कोणत्याही परिस्थितीत हलके भारी काम हा विचार न करता नियमितपणे शाश्वत पैसे मिळतील असे कोणतेही काम करा . लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका .

(३) आपल्या शिक्षणाचा व कष्टाने कमावलेल्या पैशाचा सदुपयोग करून नियमितपणे पुढील वाटचाल सुरू ठेवा .

(४) कोणत्याही परिस्थितीत गुणवत्ता व दर्जा याबाबत तडजोड करु नका . आपली वाणी लेखणी वर्तन शिवरायांच्या सुपुत्रांनो उत्तम ठेवून यशस्वी व्हा .

(५) प्रत्येकाने आपापल्या परीने कुटुंबातील वा समाजातील सर्वच महिलांना सन्मानजनक वागवावे . महिलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे . महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात कष्टकरी कल्पक हुशार व व्यवहारी होतकरू असतात हे सूत्र लक्षात घेऊन वाटचाल करावी ..

भविष्यात पुन्हा लवकरच भेटू या ..

धन्यवाद व सदिच्छा .

कृपया सोयीचे असेल तर इतरांना पाठवावे . मला पोचपावती देणे अपेक्षित नाही .

जय जिजाऊ ..

पुरुषोत्तम खेडेकर चिखली .

संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ .


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages